पठाणकोट हल्ल्यात जैश ए महंमद या संघटनेचा हात असल्याचे पुरावे नसल्याचे जे विधान एनआयएचे प्रमुख शरद कुमार यांनी केले होते ते बघता सरकारने पठाणकोट हवाईतळावर हल्ला करणारे हल्लखोर कोठून आले होते ते सांगावे, असे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी सांगितले, की जर पठाणकोट हल्ल्यातील दहशतवादी पाकिस्तानातून आले नव्हते तर कोठून आले होते हे आता सरकारनेच सांगावे. एनआयएचे प्रमुख शरद कुमार यांच्या वक्तव्यावर सरकारने भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे, असे सांगून ते म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल यांनी दहशतवादी कोठून आले होते याचे उत्तर देणे आवश्यक आहे. पाकिस्तानचा पठाणकोट हल्ल्यात काही दोष नसल्याचे विधान करण्यात आल्याने आपल्या राजनयाचा सपशेल पराभव झाला आहे.
संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांना देशापेक्षा गोव्याची चिंता अधिक आहे, अशी कोपरखळी दिग्विजय सिंग यांनी मारली.