स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला उद्देशून केलेले भाषण हे ‘निराशाजनक’ असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे. या भाषणातून पंतप्रधानांनी देशातील तरुणांचा, शेतकऱ्यांचा आणि समाजातील कमकुवत भागाचा विश्वासघात केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा पत्रकार परिषदेत म्हणाले, मोदींना अद्याप गोरखपूर येथील घटनेचे गांभीर्य कळालेलेच नाही. इतर नैसर्गिक दुर्घटनांशी त्यांनी या प्रकरणाची तुलना केली आहे. अशा घटनांबाबत ते काळजीवाहू नसल्याचा आरोपही यावेळी शर्मा यांनी केला.


काश्मीर प्रश्नी पंतप्रधान मोदींनी केवळ दावे करण्याचे काम केले आहे. काश्मीर प्रश्नावर खोलवर जाऊन त्यांनी माहिती देणे अपेक्षित होते, असेही शर्मा म्हणाले. त्याचबरोबर मोदींनी आपल्या भाषणात सर्जिकल स्ट्राईकचाही उल्लेख केला. मात्र, हे सर्जिकल स्ट्राईक एक वर्षांपूर्वी घडले आहे. त्यांनतर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून या भागात अनेक हल्ले झाले, अजूनही येथे सतत गोळीबार होतो आहे. याबाबत मोदींनी आपल्या भाषणात बोलणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी असे न करता केवळ देशातील जनतेला राष्ट्र सुरक्षित हातात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही शर्मा यांनी यावेळी केला.

आपल्या भाषणात भ्रष्टाचाराविरोधात लढण्याच्या मोदींनी केलेल्या उल्लेखाबाबत शर्मा म्हणाले, ३१ मार्चनंतर बंद करण्यात आलेल्या नोटा अद्यापही जप्त करण्यात येत आहेत. याबाबत रिझर्व्ह बॅंक गप्प का आहे, असा सवाल त्यांनी केला.

त्याचबरोबर सरकारला वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करणे हे केवळ विरोधकांनी पाठिंबा दिल्याने शक्य झाले आहे. मात्र, याचा मोदींनी आपल्या भाषणात उल्लेख केला नाही. त्याचबरोबर भारताच्या स्वातंत्र्याला जबाबदार असलेले नेते पंडीत जवाहरलाल नेहरू यांचाही उल्लेखही त्यांनी केला नाही. देशाची अर्थव्यवस्था ‘जीएसटी’, ‘नोटाबंदी’साठी तयार नसतानाही या गोष्टी लादण्यात आल्याने त्याचे अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाले आहेत, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

त्याचबरोबर नोटाबंदीमुळे देशात अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. मात्र मोदी म्हणाले की, दोन कोटी रोजगार प्रत्येक वर्षी निर्माण केले जात आहेत. शेतकऱ्यांना त्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे फायदे अद्याप मिळालेले नाहीत, यावर त्यांनी जबाबदारीने भाष्य करणे गरजेचे होते मात्र, यावर त्यांनी मौन बाळगले, असेही ते म्हणाले.

त्याचबरोबर काँग्रेस ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद म्हणाले, काश्मीर प्रश्नाचा मोदींनी उल्लेख केल्याप्रमाणे चुकीच्या भाषेत कोणीही बोललेले नाही. मात्र, तरीही त्यांनी याचा खोटा उल्लेख आपल्या भाषणात का केला. मोदींनी आधी आपल्या स्वपक्षात इतरांबद्दल कशी भाषा वापरली जाते ते पहावे त्यानंतर इतरांबद्दल बोलावे. भाजपचे नेते आणि कार्यकर्ते स्वतः मोदींचे आदेश पाळत नाहीत याकडेही त्यांनी लक्ष द्यावे.

[jwplayer xnkG2Fd5]