महायुतीत महाफूट पडण्याची चिन्हे असताना दुसरीकडे आघाडीमध्येही सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र आहे. कॉंग्रेसने राज्यातील २८८ मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांबाबत सोमवारी केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत चर्चा केल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस मधुसूदन मिस्त्री यांनी दिली. यामुळे कॉंग्रेसही राष्ट्रवादीसोबतचा आपला घरोबा सोडून ‘एकला चलो रे’चा मार्ग स्वीकारणार का, याकडे आता लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याला सुरुवात झाली असून, येत्या शनिवारपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. अशा स्थितीत कॉंग्रेसने २८८ उमेदवारांच्या यादीवर चर्चा केल्याचे मिस्त्री यांनी सांगितले.
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीमध्ये ही बैठक झाली. बैठकीला पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहनप्रकाश, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, लोकसभेतील पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यावेळी उपस्थित होते.
बैठकीमध्ये २८८ जागांवरील उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा करण्यात आली. सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी सुमारे पावणेतीन तास ही बैठक चालली. दरम्यान, आघाडीबाबत सोमवारपर्यंत निर्णय घेण्याचा अल्टिमेटम राष्ट्रवादीने कॉंग्रेसला दिला आहे.