गरिबांना १२ रुपयांत मुंबईत जेवण मिळू शकते, अशा नवा शोध लावून स्वतःच्याच पक्षाला अडचणीत आणणाऱया खासदार राज बब्बर यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे काँग्रेसने शुक्रवारी स्पष्ट केले. पक्षाचे दुसरे एक नेते रशीद मसूद यांनी तर पाच रुपयांत जेवण मिळू शकते, असे वक्तव्य केले होते, त्याबाबतही पक्षाने असहमती दर्शविली.
या दोन्ही नेत्यांनी केलेल्या वक्तव्याशी पक्ष सहमत नाही, असे काँग्रेसच्या एका नेत्याने स्पष्ट केले. स्वतःचे नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर त्याने पक्षाची भूमिका सांगितली.
देशातील गरिबांच्या संख्येत घट झाल्याचा आणि शहरात प्रतिदिन ३३ रुपये आणि ग्रामीण भागात २७ रुपये खर्च करणारी व्यक्ती गरीब नसल्याचा निष्कर्ष नियोजन आयोगाने दोन दिवसांपूर्वी एका अहवालात काढला होता. त्यावरून नियोजन आयोगावर आणि त्याचे समर्थन करणाऱया काँग्रेसच्या नेत्यांवर सर्वस्तरांतून टीकेची झोड उठलीये.