केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी गुजरातमधील लाचखोरीच्या प्रकरणावरून काँग्रेसलाच लक्ष्य केले आहे. जर नरेंद्र पटेल यांना एक कोटी रूपये दिले आहेत, तर ते १० लाख रूपयेच का दाखवत आहेत, असा सवाल करत काँग्रेस हा एक ‘ड्रामेबाज’ पक्ष असल्याची टीका केली. काँग्रेसचा इतिहास हा खोटेपणा, भ्रष्टाचार आणि विकासाकडे दुर्लक्ष करणारा असल्याचे त्यांनी म्हटले.

रवीशंकर प्रसाद हे पत्रकार परिषदेत बोलत होते. गुजरातमध्ये सोमवारी दिवसभर झालेल्या नाट्यमय घडामोडीवर रवीशंकर यांनी भाष्य केले. राहुल गांधी यांनी कधीच विकासाचे राजकारण केले नसल्याचे त्यांनी म्हटले. एक कोटी लाच घेतल्याचा दावा केला जात आहे आणि माध्यमांना फक्त १० लाख रूपयेच दाखवण्यात येत आहे. ९० लाख रूपये कुठं गेलेत? विधानसभेतही कोट्यवधी रूपये ठेवण्यात आले होते.. त्याची चौकशी झाली नव्हती, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

सततच्या पराभवामुळे तुमचा पक्ष इतका निराश झाला आहे की, तुम्हाला नाटक करावं लागत आहे, असे राहुल गांधींचे नाव घेत त्यांनी टोला लगावला. तत्पूर्वी काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या प्रदेशाध्यक्षांविरोधात गुन्हा दाखल करण्याची आणि या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणी केली होती.

दरम्यान, भाजपत प्रवेश करण्यासाठी मला १ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली, असा गंभीर आरोप पाटीदार समाजाचे नेते नरेंद्र पटेल यांनी केला होता. १ कोटीपैकी १० लाख रुपये मला अॅडव्हान्स देण्यात आले असे सांगत त्यांनी पत्रकार परिषदेत नोटांचे बंडलच ठेवले होते. या आरोपांमुळे गुजरातच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.