तीन दिवस दहा जिल्ह्य़ातून प्रवास; कानपूरमध्ये सोमवारी समारोप

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक सुमारे आठ ते नऊ  महिने दूर असतानाच काँग्रेसने शनिवारी अधिकृत प्रचाराचा नारळ केला. त्यानुसार मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार शीला दीक्षित, महासचिव आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि प्रदेशाध्यक्ष राज बब्बर ही त्रिमूर्ती तीन दिवसांच्या बसयात्रेवर स्वार झाली आहे. ‘२७ साल, उत्तर प्रदेश बेहाल’ अशी घोषणा काँग्रेसने केली आहे.

शनिवारी सकाळी ‘२४, अकबर रोड’ या पक्ष मुख्यालयात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या हस्ते या बसयात्रेला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. ही यात्रा तीन दिवसांची असून ती दहा जिल्ह्य़ांमध्ये फिरणार आहे. येत्या सोमवारी तिचा कानपूरला समारोप होईल.

‘गेल्या २७ वर्षांमध्ये उत्तर प्रदेशात भाजप, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाचे राज्य होते. त्यांनी या राज्याची काय अवस्था करून ठेवली आहे, याकडे आम्ही जनतेचे लक्ष वेधणार आहोत. धर्म, जात, विभाग यांच्या आधारांनी या तीन पक्षांनी जनतेचे विभाजन केले, पण काँग्रेस सर्वाना बरोबर घेऊन जाणार आहे. सोनिया आणि राहुल गांधी यांचा एकतेचा संदेश आम्ही जनतेपर्यंत पोचविणार आहोत,’ असे आझाद या वेळी म्हणाले.

ही बसयात्रा पहिल्यांदा धार्मिकदृष्टय़ा संवेदनशील असलेल्या पश्चिम उत्तर प्रदेशात फिरेल. मोरादाबादमध्ये पहिला मुक्काम आहे. दुसऱ्या दिवशी (रविवारी) शहाजहाँपूर, रामपूर, बरेली या जिल्ह्य़ांमध्ये असेल आणि तिसऱ्या दिवशी हरदोई, कनौज आणि कानपूरमध्ये समारोप होईल. कोपरा सभा, महत्त्वाच्या ठिकाणी भेटी, जनतेशी हितगूज असा यात्रेचा कार्यक्रम आहे. सुमारे सहाशे किलोमीटरचे अंतर ही यात्रा कापेल.  त्यानंतर २९ जुलैला प्रदेश काँग्रेसची बैठक लखनौत बोलाविण्यात आली असून त्यास राहुल गांधींची उपस्थिती असेल.

प्रशांत किशोर यांची संकल्पना

काँग्रेससाठी अस्तित्वाची झुंज असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये यश मिळविण्याचे आव्हान स्वीकारलेले रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या कल्पनेतून ही बसयात्रा अवतरली आहे. भाजपच्या पारंपरिक रथयात्रेच्या धर्तीवर बसयात्रेची संकल्पना बेतल्याचे दिसते आहे. पुढील टप्प्यात अवध प्रांत, बुंदेलखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये ही बसयात्रा जाणार असल्याचे सांगण्यात आले. निवडणुकीपूर्वी प्रत्येक मतदारापर्यंत किमान तीनदा पोचण्याचा आराखडा तयार केल्याची माहिती निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख संजयसिंह यांनी दिली.