काँग्रेसने शनिवारी अनेक संघटनात्मक बदल केले आहेत. गोव्यात सरकार स्थापण्यात अपयश आल्यामुळे काँग्रेसने पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याकडून गोवा आणि कर्नाटकचे प्रभारीपद काढून घेतले आहे. मात्र, दिग्विजय सिंह यांनी पक्षाच्या निर्णयाचे स्वागत केले असून मी पक्षाचा एकनिष्ठ सदस्य असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. राहुल गांधी यांनी नवे पदाधिकारी निवडल्यामुळे आपल्याला खूप आनंद झाला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मी खूप आनंदी आहे. ‘अखेर ही नवी टीम राहुल गांधी यांनी निवडली,’ असे ट्विट त्यांनी केले आहे. गोवा आणि कर्नाटकमधील काँग्रेस नेत्यांबरोबर काम करतानाचा आनंद घेतला आहे. त्यांच्या सहकार्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. मी काँग्रेस आणि नेहरू-गांधी परिवाराप्रती एकनिष्ठ आहे. आज मी पक्षात जे काही आहे, ते त्यांच्यामुळे असल्याचे त्यांनी म्हटले.


शनिवारी अखिल भारतीय काँग्रेस समितीने (एआयसीसी) एका निवेदनाद्वारे दिग्विजय सिंह यांच्याकडी गोवा आणि कर्नाटकचे प्रभारी पद काढून घेतल्याचे जाहीर केले होते. काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख यांना राज्याचे सचिव बनवल्याचे या निवेदनात म्हटले आहे. पुढील वर्षी कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. तिथे के.सी.वेणुगोपाल यांना सरचिटणीसपदी नेमले आहेत. त्यांना मदत करण्यासाठी मनिकम टागोर, पी.सी.विष्णुनंद, मधु याक्षी गौड आणि डॉ. शैलजानाथ यांनाही कर्नाटकात पाठवण्यात आले आहे. राहुल गांधी यांनी स्वत: या सर्वांची नियुक्त केली आहे.
गोव्यात सर्वांत मोठा पक्ष बनूनही काँग्रेसला तिथे सरकार स्थापता आले नव्हते. यावरून दिग्विजय सिंह यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. गत महिन्यात गोवाचे देशाध्यक्ष लुइजिन्हो फलेरियो यांनीही या अपयशाचे खापर दिग्विजय सिंह यांच्यावर फोडले होते. या नियुक्त्यांवरून काँग्रेसने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. येत्या काही दिवसांत पक्षामध्ये अनेक संघटनात्मक बदल दिसण्याचे संकेत देण्यात आले आहेत.