राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या समर्थनात उतरलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर काँग्रेसचे नेते गुलामनबी आझाद यांनी निशाणा साधला आहे. नितीश कुमार यांनीच मीरा कुमार यांच्या पराभवाबाबत सर्वांत प्रथम वक्तव्य केले आहे. आपल्याच राज्यातील नेत्याबाबत त्यांनी ही टिप्पणी केली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच ज्या लोकांचे एक तत्व असते. त्यांचा निर्णयही एकच असतो. ज्यांचे कुठलेच तत्व किंवा सिद्धांत नसते ते सातत्याने आपले निर्णय बदलत असतात, असा टोला ही त्यांनी नितीश कुमार यांचे नाव न घेता लगावला.

दरम्यान, नितीश कुमार यांनी कोविंद यांना पाठिंबा दिल्यानंतर महाआघाडी करण्याची अपेक्षा ठेवून असलेल्या विरोधी पक्षांना मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच नव्हे तर बिहारमध्ये सत्तेत भागीदार असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) प्रमुख लालूप्रसाद यादव यांनीही नितीश कुमार यांच्यावर टीका केली होती.

नितीश यांच्या या निर्णयामुळे चुकीचा संदेश जाईल. स्वत: नितीश कुमार हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघ मुक्त भारताबाबत बोलत असतात. पण आता स्वत:च एनडीएबरोबर ते उभे आहेत. हे मला कळण्यापलीकडचे असल्याचे ते म्हणाले. तसेच नितीश यांनी या पाठिंब्यावर फेरविचार करावा यासाठी त्यांच्याबरोबर चर्चा करणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

तत्पूर्वी, काँग्रेसने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावरही टीका केली हेाती. सुषमा स्वराज यांचे ट्विटवर असं भासतं की, मीरा कुमार यांनी स्वराज यांना बोलायलाच दिले नव्हते. सदस्यांना दिलेल्या निश्चित वेळेत त्यांना बोलायला सांगण्यात आले असेल. जर नियमाबाहेर गेले तर त्याला रोखणे हे अध्यक्षांचे कामच असते. मला हा मोठ मुद्दा वाटत नाही, असे काँग्रेसचे नेते टॉम वडक्कन यांनी म्हटले.

तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते एन.ए.हॅरिस यांनी सुषमा स्वराज यांच्या या वक्तव्यावर तोंडसुख घेतले. सन्मानित व्यक्तीबद्दल असे बोलणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक जण मीरा कुमार यांच्या कौटुंबीक पार्श्वभूमीबाबत आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाबाबत जाणतो. सुषमा स्वराज या सरकारमध्ये महत्वाच्या पदावर होत्या. त्यांनी अशापद्धतीने बोलणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.