हिंदी भाषा शिकण्याचा आग्रह धरणाऱ्या केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडूंवर कांग्रेस नेते शशी थरुर यांनी पलटवार केला आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा नसून हिंदी भाषा कोणावरही लादता येणार नाही असे थरुर यांनी म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी शनिवारी हिंदी भाषा सक्तीसंदर्भात विधान करुन नवीन वादाला तोंड फोडले आहे. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे आणि ती प्रत्येकाला आलीच पाहिजे, ती प्रत्येकाने शिकली पाहिजे, असे नायडूंनी म्हटले होते. या विधानाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते शशी थरुर यांनी व्यंकय्या नायडूंचे थेट नाव न घेता पलटवार केला. ‘हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. हिंदी ही भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असून समजण्यासाठी ही भाषा सोपी आहे. पण या भाषेची तुम्हाला कोणावरी सक्ती करता येणार नाही किंवा लादताही येणार नाही’ असे थरुर यांनी सांगितले. थरुर यांनी अप्रत्यक्षरित्या नायडूंना उत्तर दिल्याचे यावरुन दिसते.

दरम्यान, हिंदीसोबतच मराठी, भोजपुरी, गुजराती, तामिळ, बंगाली या भाषाही महत्त्वाच्या आहेत. या भाषांसोबत भावही व्यक्त होतो. पण आपण दुर्दैवाने इंग्रजीला जास्त महत्त्व दिले. इंग्रजी या भाषेला माझा अजिबात विरोध नाही. मात्र या भाषेचा जितका प्रभाव आहे त्यापेक्षा जास्त आपल्याला आपल्या मातृभाषेचा, राष्ट्रभाषेचा अभिमान असायला हवा असे नायडूंनी म्हटले होते. नायडूंच्या हिंदी प्रेमावरुन अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.