केंद्र सरकारकडून लोकसभेत सादर करण्यात आलेल्या वादग्रस्त भूमी अधिग्रहण विधेयकाला विरोध करण्यासाठी कॉंग्रेसकडून बुधवारी नवी दिल्लीमध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली. हे विधेयक शेतकरीविरोधी असून, ते तातडीने मागे घेण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
याच विधेयकाचा विरोध करण्यासाठी गेले दोन दिवस ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्त्वाखाली जंतर-मंतरवर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर त्याच ठिकाणी बुधवारी कॉंग्रेसने जोरदार शक्तीप्रदर्शन करीत या विधेयकाचा विरोध केला.
कॉंग्रेस नेते जयराम रमेश, दिग्विजय सिंग आणि सुबोधकांत सहाय यांच्या नेतृत्त्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. या वेळी सभेत बोलताना राज बब्बर म्हणाले, हे विधेयक शेतकरीविरोधी आहे. या विधेयकाला आम्ही कधीच पाठिंबा देणार नाही. सरकारने शेतकऱयांच्या हिताचे संरक्षण केलेच पाहिजे.
केंद्र सरकारने अध्यादेशाच्या माध्यमातून यूपीए सरकारने केलेल्या कायद्यामध्ये बदल केल्यापासून कॉंग्रेसने त्याला विरोध केला असून, सरकारची भूमिका शेतकरीविरोधी असल्याचे म्हटले होते.