प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने चिटफंड घोटाळ्याप्रकरणी केलेली चर्चेची मागणी फेटाळल्यामुळे ओदिशा विधानसभेत काँग्रेस आमदारांनी गोंधळ घातला. सभापतींच्या दिशेने बॅनर फेकण्यात आले तसेच ध्वनिक्षेपकाचीही मोडतोड करण्यात आली. एकीकडे विरोधकांनी सभागृह दणाणून सोडले असताना दुसरीकडे सत्ताधारी बिजू जनता दलाच्या आमदारांनीही केंद्र सरकारकडून ओदिशाकडे होणाऱ्या अक्षम्य दुर्लक्षावर नाराजी व्यक्त करीत सभागृहातील मोकळ्या जागेत शिरून घोषणाबाजी केली. त्यामुळे नाइलाजास्तव सभापतींनी विधिमंडळाचे कामकाज तहकूब केले.
विधिमंडळाच्या कामकाजास सोमवारी सुरुवात होताच सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी पोस्टर आणि बॅनर फडकावत सभापतींसमोरील मोकळ्या जागेत धाव घेतली. ओदिशा राज्याचे हितसंबंध केंद्राकडून जाणीवपूर्वक नजरेआड केले जात आहेत, असा आरोप करीत सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला. पोलावरम् प्रकल्प आणि नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदतीत होणारी दिरंगाई हे मुद्दे उचलून धरीत सत्ताधाऱ्यांनी सभागृह दणाणून सोडले. या गोंधळामुळे सभापती निरंजन पुजारी यांनी ३ वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले.
दुसऱ्या सत्रातील कामकाज विरोधकांच्या गदारोळात वाहून गेले. चिटफंड घोटाळ्यावर चर्चा करावी, अशी मागणी विरोधकांनी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत विधिमंत्र्यांना विधेयक सादर करण्याच्या सूचना सभापतींनी दिल्यामुळे विरोधक आक्रमक झाले. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस आमदारांनी मोकळ्या जागेत धाव घेतली आणि जोरदार घोषणाबाजी केली. काही काँग्रेस आमदारांनी सभापतींच्या दिशेने बॅनर आणि पोस्टर भिरकावले. काँग्रेसचे मुख्य प्रतोद तारा प्रसाद बहिनीपती यांनी तर ध्वनिक्षेपकच हातात घेऊन त्याची मोडतोड केली. अखेर सदनाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.