उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांतील १४० जागांवरील उमेदवारांच्या यादीला काँग्रेसने अंतिम स्वरूप दिल्यामुळे राज्यात काँग्रेस व समाजवादी पक्षात युती होण्याबाबतचे गूढ अद्याप कायम आहे.मात्र, युती होण्यासाठी वाव कायम ठेवून काँग्रेसने पहिल्या दोन टप्प्यांतील जागांची घोषणा मात्र केली नसून, सपसोबतची बोलणी अद्याप सुरू असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले.

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या (सीईसी) निवडणुकीच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील १४० जागांवरील उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत, असे पक्षाचे सरचिटणीस व उत्तर प्रदेशचे प्रभारी गुलाम नबी आझाद यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.

समाजवादी पक्षासोबतची युती कायम आहे की संपली, असे विचारले असता आझाद म्हणाले, बघू या काय होते ते. रविवारी सकाळपर्यंत याबाबतची घोषणा होईल तेव्हा तुम्हाला काय ते कळेल. इकडे, काँग्रेस राज्यातील पहिल्या दोन टप्प्यांतील निवडणुका संपूर्ण ताकदीने लढवेल, असा दावा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी केला. सपसोबत युतीच्या बोलण्यांमध्ये कुठलेही अडथळे नाहीत, असे सांगून प्रस्तावित युतीबद्दलचे गूढ त्यांनी कायम ठेवले.

जागावाटपाबाबत काँग्रेस व सप या दोन्ही पक्षांनी आपली भूमिका ताठर केली असून त्यामुळे या मुद्दय़ावरील तिढा कायम असल्याचे सूत्रांनी सांगितले.

समाजवादी पक्ष शंभरहून अधिक जागा सोडण्यास तयार नाही; तर सुरुवातीला युतीमध्ये दीडशेहून अधिक जागांची मागणी करणाऱ्या काँग्रेसने बरेच नमते घेतले असले तरी सप जितक्या जागा देण्यासाठी आग्रही आहे, तेवढय़ा कमी जागा मान्य करण्याची काँग्रेसची तयारी नाही. राज्यात भाजपला सत्तेबाहेर ठेवायचे असेल, तर दोन्ही पक्षांसाठी युती करणे अनिवार्य असल्याचे काँग्रेस व सप या दोन्ही पक्षांतील नेत्यांचे मत आहे.