काँग्रेसचा आरोप; निवडणूक आयोगाकडे तक्रार

मुंबई : राज्यातील २५ जिल्हय़ांत नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायती सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने सर्रास काळ्या पैशाचा वापर केल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. या  प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी राज्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.

संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांची भेट घेऊन भाजपने निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर केल्याचा आरोप केला. निवडणूक निकालानंतर भाजपसोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या मुखपत्रात चलनातून हद्दपार करण्यात आलेल्या हजार आणि पाचशेच्या नोटांचा भाजपने सर्रास वापर केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शिवसेनेचा हा आरोप गंभीर असून आयोगाने याची चौकशी करावी. तसेच सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या ‘लोकमंगल मल्टिस्टेट’ पतपेढीच्या वाहनात ९१ लाखांची रोकड सापडल्या प्रकरणाचीही चौकशी करावी, अशी मागणी निरुपम यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून आचारसंहितेचा भंग

निवडणुकीच्या प्रचारादम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदी कार्यक्रमाला विरोध करणारे ‘देशद्रोही’ असे वक्तव्य करून आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यांच्या या वक्तव्याची आयोगाने स्वत: दखल घेऊन कारवाई करायला हवी होती. मात्र ती झालेली नसून आम्ही त्याबाबतही आयोगाकडे तक्रार केल्याचे निरुपम यांनी सांगितले.