काँग्रेसने अध्यादेशांच्या मुद्द्यावरून टीका करणे म्हणजे, सैतानाच्या मुखातून पवित्र उद्गार बाहेर पडण्यासारखे असल्याची जळजळीत टीका वेंकय्या नायडू यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केली. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी संसदेत भाजपच्या कार्यपद्धतीवर आगपाखड केल्यानंतर मंगळवारी संसदीय कामकाज मंत्री वैंकय्या नायडू सरकारच्या बचावासाठी पुढे सरसावले. यावेळी त्यांनी अध्यादेशाच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी केलेल्या टीकेचा प्रतिवाद केला. राहुल गांधी यांनी आमच्यावर व्यवस्थित गृहपाठ करूनच टीका करावी. कारण, काँग्रेसच्या गेल्या ५० वर्षांच्या काळातच तब्बल ४५६ अध्यादेश जारी करण्यात आले आहेत. त्यापैकी पंडित नेहरु आणि इंदिरा गांधींच्या कार्यकाळात प्रत्येकी ७७ अध्यादेश जारी करण्यात आल्याचे नायडू यांनी सांगितले.
राहुल गांधी यांनी सोमवारी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारला भू-संपादन विधेयकाच्या मुद्दयावरून लक्ष्य केले होते. नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात ‘अच्छे दिन’ आलेच नाहीत. उलट हे सरकार ‘सूट-बूट’वाल्यांचे झाले, अशा शब्दात राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला होता. मात्र, काँग्रेस पक्षाचे आत्ताचे वागणे म्हणजे “सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली,”  अशाप्रकारातील असल्याचा टोला वेंकय्या नायडू यांनी राहुल गांधींना लगावला.