रणनीतीकार प्रशांत किशोर यांची सूचना

उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्षाच्या भवितव्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी काँग्रेसने निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची निवड केली असून त्यांनी पक्षाला २०१७ मध्ये होणाऱ्या या महत्त्वाच्या राज्यातील निवडणुकीसाठी ब्राह्मणांपर्यंत पोहोचण्याची सूचना केल्याने पक्षात त्याबाबतची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत किशोर यांनी वरील सूचना केली असून त्यामुळे लखनऊ आणि दिल्लीतील काँग्रेसच्या धुरिणांमध्ये मतभिन्नता आहे. बाबरी मशीद प्रकरण होण्यापूर्वी ब्राह्मण हे काँग्रेसच्या केंद्रस्थानी होते. तीच कल्पना पुन्हा एकदा कृतीत आणावी, अशी सूचना किशोर यांनी केल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.
काँग्रेसच्या सवर्ण आधारामुळेच उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि बसपा यांचा जन्म झाला, असे किशोर यांचे म्हणणे असून त्याच्याशी पक्षातील काही जणांनी सहमती दर्शविली आहे. उत्तर प्रदेशात १० टक्के ब्राह्मण असून ते काँग्रेसचे पारंपरिक मतदार होते. त्यानंतर भाजपने त्यामधील काही भाग खेचून घेतला. मात्र भाजपच्या ब्राह्मण मतांच्या संख्येत आता घट होऊ लागली आहे, असे लोकनीतीच्या अभ्यासात आढळून आले आहे.
टक्केवारीचा खेळ..
* २००२ (५० टक्के) ते २००७ (४४ टक्के) मध्ये काँग्रेसच्या सहा टक्के ब्राह्मण मतांमध्ये घट झाली, तर २००७ ते २०१२ या काळात ३८ टक्के इतकी घट झाली.
* सपाने २०१२ मध्ये झालेली निवडणूक जिंकली तेव्हा त्यांना ब्राह्मणांची १९ टक्के मते मिळाली, असे लोकनीतीच्या अभ्यासात म्हटले आहे.