पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत भारताचा गौरव वाढवला व काँग्रेसच्या पंतप्रधानांनी केलेल्या विकासकामांची कामाची पावती दिल्याची प्रतिक्रिया काँग्रेसने व्यक्त केली आहे.
जम्मू-काश्मीर भारताचे अविभाज्य अंग असल्याचे नमूद करून काँग्रेस प्रवक्ते राज बब्बर यांनी मोदींची पाठ थोपटली आहे. अर्थात मोदींचे कौतुक करीत असताना नेहरू-गांधी परिवाराचे गुणगान गाण्यास राज बब्बर विसरले नाहीत. देशाच्या विकासात सर्वाधिक योगदान पं. नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधी यांचेच आहे, असे ते म्हणाले. मोदींनी यापैकी कुणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांनी एक प्रकारे यांनाच भारताच्या विकासाचे श्रेय दिले आहे. राज बब्बर म्हणाले की, देशाचा विकास एका दिवसात झाला नाही.
 काँग्रेसच्या दूरदर्शी पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयाचे परिणाम आज दिसत आहे. मंगळ मोहीम यशस्वी झाल्याचे श्रेय शास्त्रज्ञांना देताना ‘इस्त्रो’ची स्थापना पं. नेहरू यांनी केल्याचे राज बब्बर यांनी नमूद केले. नेहरू-इंदिरा व राजीव गांधी यांनी गेल्या ६० वर्षांत केलेल्या तपश्चर्येचे हे फळ आहे.
विशेष म्हणजे राज बब्बर यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा एकदाही उल्लेख केला नाही. आतापर्यंत मोदी यांनी एकदाही काँग्रेसच्या पंतप्रधानांचे नाव घेतले नाही, परंतु अमेरिकेत त्यांनी उशिरा का होईना काँग्रेसचे कर्तृत्व मान्य केले. भाजप सरकारने काँग्रेसच्या काळात घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली. त्यात फारसे काहीही नवीन नाही, असेही राज बब्बर म्हणाले. गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसला जणू मोदीप्रेमाचे भरते आले आहे. माजी केंद्रीयमंत्री शशी थरूर यांनीदेखील मोदींवर स्तुतिसुमने उधळली आहेत.