केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मीरा कुमार यांच्या विरोधात पोस्ट केलेल्या व्हिडीओला,काँग्रेसनेही व्हिडीओनेच उत्तर दिले आहे. ‘सुषमाजी आम्ही तुम्हाला आठवणींच्या जगात घेऊन जातो’ असे शीर्षक देऊन, काँग्रेसने एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. या २४ सेकंदांचा हा व्हिडीओ निवडणुकांच्या आधीचा आहे. ज्यात सुषमा स्वराज विरोधी पक्षनेत्या आहेत आणि त्या, त्यावेळच्या लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव करताना दिसत आहेत. तुमचा स्वभाव किती चांगला आहे, लोकसभेत तुम्ही किती धीराने आणि संयमाने कामकाज करता असे सुषमा स्वराज मीरा कुमार यांना म्हणत आहेत. तसेच तुमच्या या स्वभावासाठी माझ्या मनात तुमच्याबद्दल खूप आदर आहे असेही या व्हिडीओत सुषमा स्वराज यांनी मीरा कुमार यांना उद्देशून म्हटले आहे.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आता काँग्रेस आणि भाजप यांच्यात व्हिडीओ वॉर सुरू झाल्याचे चित्र आहे. कारण केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी रविवारीच पाहा ‘मीरा कुमार कशी गळचेपी करतात’ असे शीर्षक देत चार वर्षांपूर्वीचा एक व्हिडीओ शेअर केला होता. तसेच माझ्या सहा मिनिटांच्या भाषणात मला मीरा कुमार यांनी ६० वेळा रोखले असेही सुषमा स्वराज यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले होते.

रालोआकडे बहुमत आहे. त्यामुळे रामनाथ कोविंद हे एनडीएचे उमेदवारच राष्ट्रपती होण्याची शक्यता जास्त आहे. अशात सुषमा स्वराज यांनी मीरा कुमार यांच्याविरोधात हा व्हिडीओ का पोस्ट करून त्यांच्यावर निशाणा साधला. या व्हिडीओला काँग्रेसने त्याच पद्धतीने उत्तर दिले आहे. आता या दोन्ही व्हिडीओंची चर्चा चांगलीच रंगली आहे.

काँग्रेसने या व्हिडीओला उत्तर देत आपल्याच @INCIndia या अधिकृत ट्विटर हँडलवरून सुषमा स्वराज यांचा व्हिडीओ पोस्ट करत त्यांना उत्तर दिले आहे. मीरा कुमार या काँग्रेस आणि विरोधी पक्षाने निवडलेल्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार आहेत. तर एनडीएतर्फे रामनाथ कोविंद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक जवळ आलेली असतानाच सुषमा स्वराज यांनी मीरा कुमार यांच्यावर आरोप करणारा व्हिडीओ पोस्ट करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र काँग्रेसने या व्हिडीओला प्रत्युत्तर देत सुषमा स्वराज यांचाच एक व्हिडीओ पोस्ट करून त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.