वर्षभरापूर्वी गलितगात्र झालेला काँग्रेस पक्ष मोदी सरकारच्या वर्षपूर्तीच्या उंबरठय़ावर आक्रमक झाला आहे. येत्या आठवडाभर केंद्र सरकारविरोधात देशभर पत्रकार परिषदा आयोजित करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच हल्ला करणार आहेत. एकीकडे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना जमीन अधिग्रहणावरून शेतकरीविरोधी ठरवलेले असताना वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांसह भाजपचे नेते तब्बल पन्नासेक शहरांमध्ये पत्रकार परिषदा घेणार आहेत. त्यासाठी खास रणनीती आखण्यासाठी अलीकडेच झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत भाजपाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, अनंतकुमार, धर्मेद्र प्रधान, जे. पी. नड्डा उपस्थित होते. याच बैठकीत केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जन-धन सुरक्षा योजनेचा प्रारंभ एकाच वेळी शंभर स्थानांवरून करून त्यासाठी केंद्रीय मंत्री व भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांना धाडण्यात आले होते. उद्यापासून १० जूनपर्यंत वर्षभर काय केले, हे सांगण्याची वेळ आलेल्या केंद्र सरकारला जमीन अधिग्रहण विधेयकामुळे मोठा फटका बसला आहे. त्यावरच पुढील आठवडाभर काँग्रेस नेते प्रचार करणार आहेत.
    महाराष्ट्रात अलीकडेच केंद्रीय एससी आयोगाचे अध्यक्ष पी. एल. पूनिया यांची पत्रकार परिषद झाली. याखेरीज माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल, महिला काँग्रेस अध्यक्षा शोभा ओझा, अजय माकन, आमदार प्रणिती शिंदे राज्यात पत्रकार परिषद घेणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. सरकारला घेरण्यासाठी आखलेल्या या रणनीतीनुसार प्रत्येक राज्यात किमान दोन पत्रकार परिषदा घेण्यात येणार आहेत. एक स्थान राज्याच्या राजधानीचे शहर असेल. याची जबाबदारी महासचिव-राज्य प्रभारी व प्रदेशाध्यक्षांना सोपविण्यात आली आहे. दिल्लीत एका विषयावर केंद्रित पत्रकार परिषद होईल. ज्यात आर्थिक धोरणांवर पी. चिदम्बरम व आनंद शर्मा, परराष्ट्र धोरणावर सलमान खुर्शीद व आनंद शर्मा, जमीन अधिग्रहणावर जयराम रमेश, सी. पी. जोशी, अल्पसंख्याकांच्या प्रश्नावर शकील अहमद सरकारविरोधात पत्रकार परिषद घेणार आहेत.  

वाराणसीत हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत २५ मे रोजी माजी केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री जयराम रमेश पत्रकार परिषद घेणार आहेत. गेल्या वर्षभरात स्वत:च्या मतदारसंघासाठी मोदी यांनी काय केले यावर टीका न करता जमीन अधिग्रहण कायद्याविरोधात सरकारला घेरण्यात येईल. निवडणुकीतील आश्वासने व प्रत्यक्ष कामगिरीमधील फरक पटवून देण्याचा प्रयत्न काँग्रेस प्रवक्ते करणार आहेत. याखेरीज मोदी सरकारच्या कामकाजाविरोधात पुस्तिका प्रसिद्ध करण्यात येईल.