गेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचा मुलगा राहुल गांधी यांच्याकडून संसदेचे कामकाज रोखून धरण्यात येत असल्याचा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आसाममध्ये केला. आसाममध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आसाम दौऱ्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
मोदी म्हणाले, काँग्रेसवगळता विरोधी पक्षांत बसलेल्या इतर सर्व पक्षांना संसदेचे कामकाज सुरळीत चालावे, असे वाटते. पण एका कुटुंबाला केवळ नकाराचे राजकारण करायचे असल्यामुळे त्यांच्याकडून संसदेला वेठीस धरण्यात येत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत जे ४०० वरून अवघ्या ४० पर्यंत खाली घसरले त्यांनी आता मोदींना कामच करू द्यायचे नाही, असे ठरवले आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून संसदेच्या कामकाजात वेगवेगळे अडथळे तयार करण्यात येत आहेत. देशासाठी महत्त्वाची विधेयके रोखून धरली जात आहेत. त्यांच्याकडून बदला घेण्याचे राजकारण करण्यात येत आहे, असे मोदी यांनी सांगितले.
काँग्रेसच्या सदस्यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे संसदेच्या गेल्या दोन्ही अधिवेशनात फारसे कामकाज होऊ शकलेले नाही. वस्तू व सेवा करासारखे महत्त्वाचे विधेयक संसदेत प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला.