राष्ट्रपतींची भेट घेणार
दादरी प्रकरण तसेच दलित कुटुंबाला जिवंत जाळण्याच्या घटना व वाढत्या असहिष्णुतेविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस खासदार व काँग्रेस कार्य समितीचे सदस्य उद्या मंगळवारी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची भेट घेणार आहेत. काँग्रेस नेते संसद ते राष्ट्रपती भवन पायी ‘निषेध मोर्चा’ काढून सरकारविरोधात शक्तिप्रदर्शन करणार आहेत. वर्षभरात पायी निषेध काढण्याची काँग्रेस नेत्यांची ही सलग दुसरी वेळ आहे. यापूर्वी जमीन अधिग्रहण विधेयकावरील अध्यादेश रद्द करण्यासाठी काँग्रेसचे तमाम नेते रस्त्यावर उतरले होते.
गेल्या काही दिवसांपासून देशात असहिष्णुता पसरवणाऱ्या घटना वाढल्या आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर मौन बाळगून आहेत. त्याविरोधात आम्ही राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना साकडे घालणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी दिली. दरम्यान, सोनिया गांधी यांनी आजदेखील राष्ट्रपती मुखर्जी यांची भेट घेतली. मात्र ही भेट अन्य कारणांसाठी असल्याचे सांगण्यात आले. शिखांचे शिरकाण होत असताना काँग्रेस सरकार निष्क्रिय होते, असा आरोप मोदी यांनी बिहारमधील भाषणात केला होता. संतप्त झालेल्या काँग्रेसने मोदी मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीची आठवण करून दिली. आनंद शर्मा म्हणाले की, शीख दंगली भडकलेल्या असताना तत्कालीन काँग्रेस सरकारने लष्कराला पाचारण केले होते; परंतु २००२ मध्ये गुजरातमध्ये दंगल पेटलेली असताना मोदींनी लष्कर येऊ दिले नाही.