राहुल गांधी यांना विश्वास

गुजरातमधील बहुचचर्चित विकासाच्या मॉडेलचा बोजवारा उडाला असल्याने गुजरात विधानसभेच्या निकालाची सत्तारूढ भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता धास्ती वाटू लागली आहे, असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

गुजरातमध्ये काँग्रेस जवळपास दोन दशके विरोधी पक्षांत आहे, मात्र या निवडणुकीनंतर काँग्रेस सत्तेवर येईल, असा विश्वासही राहुल गांधी यांनी पक्षकार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला. गुजरातमध्ये सत्ता स्थापन करण्यापासून आता काँग्रेसला कोणीही रोखू शकणार नाही, असा आपला ठाम विश्वास असल्याचे गांधी म्हणाले.

गुजरातमधील विकासाच्या मॉडेलचा आता बोजवारा उडाला आहे, भाजप आणि मोदी यांना विधानसभा निकालाची धास्ती वाटू लागली आहे, सत्य फार काळ दडवून ठेवता येत नाही, असेही गांधी म्हणाले. या तथाकथित मॉडेलचा कोणालाही म्हणजेच युवक, शेतकरी, छोटे व्यापारी अथवा दुकानदार लाभ झाला नाही, केवळ पाच-१० लोकांनाच त्याचा लाभ झाला, असे त्यांनी सांगितले.

मोदी सरकार माध्यमांवर विनाकारण दबाव आणत आहे, आपल्याला भीती वाटत असल्याचे माध्यमांतील काही जणांनी आपल्याला सांगितले, असा दावाही त्यांनी केला. भाजपशी बुथपातळीवर दोन हात करून त्यांचा खोटारडेपणा उघडकीस आणा, असे आवाहनही गांधी यांनी कार्यकर्त्यांना केले.

८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी ८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली. नियोजित कार्यक्रमानुसार, खासदार राहुल गांधी ८ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता नांदेड येथे काँग्रेसच्या विभागीय मेळाव्याला मार्गदर्शन करतील. त्यानंतर दुपारी १.३० वाजता ते परभणी येथे शेतकरी संघर्ष सभेला संबोधीत करणार आहेत.