भाजपला रोखण्यासाठी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने संसदेवरील हल्ल्याचा आरोपी अफजल गुरू याला बळीचा बकरा बनवले, असा आरोप पीडीपीचे सर्वेसर्वा मुफ्ती मोहम्मद सईद यांनी केला. मात्र काँग्रेसची ही जातीय खेळी भाजपला रोखण्यात अपयशी ठरल्याचे सईद यांनी मान्य केले.
दक्षिण काश्मीरमध्ये दुरू मतदारसंघातील प्रचारसभेत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यावरही टीका केली. स्वत:ची धर्मनिरपेक्ष प्रतिमा निर्माण करण्यासाठी तसेच काँग्रेसच्या मदतीची परतफेड करण्यासाठी ओमर यांनीही अफजल गुरूच्या फाशीला संमती दिल्याची टीका सईद यांनी केली. तसेच काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्सने शेवटच्या क्षणी गुरूच्या कुटुंबीयांना त्याला भेटू दिले नाही, असा आरोप केला. तात्विकदृष्टय़ा भाजपला रोखण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा काँग्रेसने एकापाठोपाठ एक तडजोडी केल्या, त्याचा फटका त्यांना तर बसलाच पण यातून ओमर यांचा एकछत्री कारभार सुरू झाला. जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्सच्या राजकारणामुळे जी पोकळी निर्माण झाली त्यात भाजपने संधी साधली, असे त्यांनी स्पष्ट केले.