गुजरातमध्ये नर्मदा नदीजवळ उभारण्यात येणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकावरुन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. सरदार पटेल यांचा पुतळा चीनमध्ये तयार होत असून त्यामागे ‘मेड इन चायना’ असा शिक्कादेखील आहे. देशासाठी ही बाब लाजिरवाणी असल्याचा घणाघात राहुल गांधींनी केला आहे.

नर्मदा नदीजवळ सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंचीचा पुतळा उभारण्यात येणार असून हा जगातील सर्वात उंच पुतळा ठरणार आहे. लोखंड आणि तांबे यांच्या मिश्रणातून पुतळा तयार होत असून नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना ऑक्टोबर २०१३ मध्ये स्मारकाचे भूमिपूजन झाले होते. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे सध्या गुजरात दौऱ्यावर असून मंगळवारी त्यांनी जामनगर आणि खिजदिया या भागाचा दौरा केला. खिजदियातील सभेत राहुल गांधींनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकावरुन भाजपवर टीका केली. हा पुतळा चीनमध्ये तयार होत असून त्यामागे ‘मेड इन चायना’ असा शिक्का असल्याचा दावा त्यांनी केला. पाटीदार समाजावर मोदी सरकारने गोळीबार केला, पण काँग्रेसला सर्वांना एकत्र घेऊन पुढे जायचे आहे असे सांगत त्यांनी पाटीदार समाजाला साद घालण्याचा प्रयत्न केला.

जामनगरमध्ये संबोधित करताना काँग्रेस उपाध्यक्ष गुजरात सरकारवर बरसले. राहुल गांधी म्हणाले, गुजरातमधील विद्यमान सरकार हे रिमोट कंट्रोलने चालते, दिल्लीतून हा रिमोट ऑपरेट केला जातो. राज्यातील सरकार हे दिल्ली नव्हे तर गुजरातमधूनच चालवणे गरजेचे आहे असा चिमटा त्यांनी भाजपला काढला.

सरदार पटेल यांचे स्मारक आधीपासूनच वादग्रस्त ठरले आहे. पर्यावरणप्रेमींनी या पुतळ्यावर आक्षेप घेतला होता. हा पुतळा पर्यावरणीय दृष्टिकोनातून संवेदनशील असलेल्या क्षेत्रामध्ये असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.