काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणूक होऊ घातलेल्या गुजरातमधील प्रचारादरम्यान राहुल गांधींनी सातत्याने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. मात्र याच प्रचार दौऱ्यादरम्यान राहुल गांधींसोबत एक विचित्र घटना घडली आहे. गुजरातमधील छोटा उदयपूरमध्ये प्रचारासाठी गेले असताना राहुल गांधी चुकून महिलांसाठीच्या स्वच्छतागृहात गेले. ‘इंडिया टुडे’ने याबद्दलचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

राहुल गांधी छोटा उदयपूर जिल्ह्यात ‘संवाद’ कार्यक्रमासाठी आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते तरुणांसोबत संवाद साधणार होते. या कार्यक्रमानंतर राहुल गांधी सभागृहातून बाहेर पडले आणि महिला स्वच्छतागृहात गेले. महिला आणि पुरुषांसाठी उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहांबाहेर कोणतीही स्पष्ट खूण नसल्याने हा प्रकार घडला. त्यामुळे दोन स्वच्छतागृहांमधील फरक लक्षात येणे अवघड होते. कार्यक्रमस्थळी महिलांसाठी असलेल्या स्वच्छतागृहाबाहेर केवळ एक कागद चिकटवण्यात आला होता. यावर ‘महिला माटे शौचालय’ असे लिहिण्यात आले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वच्छतागृहाबाहेर कोणतीही स्पष्ट खूण न दिसल्याने आणि गुजराती समजत नसल्याने राहुल गांधी चुकून महिलांच्या स्वच्छतागृहात शिरले. आपली चूक लक्षात येताच राहुल गांधी लगेच स्वच्छतागृहाच्या बाहेर आले. दरम्यानच्या काळात राहुल गांधींच्या मागोमाग आलेल्या लोकांची मोठी गर्दी स्वच्छतागृहाबाहेर जमली होती. राहुल गांधी यांना पाहताच उपस्थित लोक हसू लागले. हा संपूर्ण प्रकार प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाला.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी सध्या गुजरातमध्ये आहेत. गुजरातमधील प्रचारसभांमध्ये बोलताना त्यांनी अनेकदा पंतप्रधान मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य केले आहे. ‘राष्टीय स्वयंसेवक संघ हीच भाजपची मुख्य संघटना आहे. त्यामध्ये किती महिला आहेत ? तुम्ही एखाद्या महिलेला शॉर्ट्स घालून संघाच्या शाखेत जाताना पाहिले आहे का? मी तर पाहिलेले नाही,’ अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी मंगळवारी संघावर टीका केली. राहुल गांधींच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. राहुल यांनी माफी मागावी, अशी मागणी गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी केली आहे. राहुल यांनी महिलांचा अपमान केल्याचे पटेल यांनी म्हटले आहे.