संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या सडेतोड भाषणाची सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. ‘भारत आणि पाकिस्तान एकाचवेळी स्वतंत्र झाले. स्वातंत्र्यानंतर भारताने आयआयटी, आयआयएमसारख्या जगप्रसिद्ध संस्था उभ्या केल्या. मात्र पाकिस्ताने केवळ दहशतवादी संघटना तयार केल्या,’ अशा कडक शब्दांमध्ये स्वराज यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. या भाषणावर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देत स्वराज यांचे ‘आभार’ मानले आहेत. ‘काँग्रेसचे व्हिजन मान्य केल्याबद्दल धन्यवाद’, असे ट्विट करत राहुल गांधींनी स्वराज यांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधींच्या या ट्विटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

‘आयआयटी, आयआयएमची स्थापना करणाऱ्यामागचे काँग्रेस सरकारचे व्हिजन मान्य केल्याबद्दल धन्यवाद’, असे ट्विट राहुल गांधींनी केले आहे. राहुल गांधींचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. त्यांच्या या ट्विटचे समर्थन करणाऱ्यांची आणि त्याला विरोध करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. ‘मागील ७० वर्षांमध्ये भारतातील सत्ताधाऱ्यांनी विकासाला प्राधान्य दिले आणि मोठी भरारी घेतली. अनेक जागतिक दर्जाच्या संस्था गेल्या ७० वर्षांमध्ये देशात उभारण्यात आल्या,’ असे सुषमा स्वराज संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत म्हणाल्या. त्याबद्दल राहुल गांधींनी स्वराज यांचे आभार मानले आहेत.

अनेकदा भाजप आणि विशेषत: पंतप्रधान मोदी काँग्रेसने ६० वर्षांमध्ये काहीच केले नाही, अशी टीका करतात. ‘काँग्रेसने देशावर ६० वर्षे राज्य केले. मात्र त्यांनी देशाचा विकास केला नाही. केवळ देशाची लूट केली,’ अशी टीका आतापर्यंत अनेकदा मोदींनी केली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, काँग्रेस पक्षाने ६० वर्षांमध्ये काँग्रेसने केलेला खड्डा भरुन काढण्यासाठी बराच कालावधी लागेल, असेही मोदी म्हणाले होते.

‘काँग्रेसने ६० वर्षांमध्ये काहीच केले नाही’, असे मोदी म्हणत असतानाच सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत आयआयटी आणि आयआयएमचा उल्लेख केला. त्यामुळे काँग्रेसला मोदींवर पलटवार करण्याची संधी मिळाली. कारण देशातील बहुतांश आयआयटी, आयआयएम, एम्सची उभारणी काँग्रेस सत्तेवर असतानाच करण्यात आली. आता खुद्द मोदींच्या मंत्रिमंडळातील स्वराज यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तीनेच त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे ‘काँग्रेसने ६० वर्षांमध्ये काय केले?’, या मोदींच्या प्रश्नाला उत्तर मिळाले आहे.