काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी दोन आठवडय़ांसाठी सुट्टीवर गेले असले तरी त्यांच्या अनुपस्थितीबद्दल अद्यापही तर्क-वितर्काना उधाण येत आहे. राहुल गांधी हे थंड हवेच्या ठिकाणी आत्मचिंतनासाठी गेले असल्याची छायाचित्रे एका दूरचित्रवाणी वाहिनीवरून प्रसारित करण्यात आली असली तरी ती २००८ मधील असल्याचा दावा पक्षाच्या वतीने केला जात आहे. राहुल गांधी हे सुट्टीवर गेल्याने ते परदेशात गेले असल्याच्या तर्क-वितर्काना उधाण आले होते. तथापि, राहुल गांधी हे उत्तराखंडमध्ये असून ते एका तंबूत वास्तव्याला असल्याची छायाचित्रे गांधी कुटुंबीयांशी जवळीक असलेले जगदीश शर्मा यांनी बुधवारी वितरित केली आणि राहुल बँकॉकमध्ये असल्याच्या वृत्ताचे खंडन केले.मात्र शर्मा यांनी केलेल्या दाव्याचे काँग्रेसचे नेते पी. सी. चाको यांनी खंडन केले आहे. शर्मा यांचा काँग्रेसशी संबंध नाही किंवा ते गांधी कुटुंबीयांच्या जवळचेही नाहीत, असे चाको यांनी म्हटले आहे.