काँग्रेसमध्ये नेतृत्वाबाबत वादविवाद सुरू असतानाच, सोनिया गांधी यांनी पक्षाला ‘आदर्श नेतृत्व’ दिल्याचे माजी कायदा मंत्री अश्विनी कुमार यांनी म्हटले आहे. अर्थात, त्यांच्या आणि पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यात काही मुद्दय़ांवरील दृष्टिकोनात तफावत असू शकेल, हे त्यांनी मान्य केले.
सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त व्हावे ही सूचना ‘पूर्णपणे अनुचित आणि अप्रिय’ असून, या चिंताजनक टप्प्यावर पक्षाला सामूहिक नेतृत्वाची गरज आहे, असे मत कुमार यांनी व्यक्त केले. सध्या आम्ही सर्वानी पक्षाची पुनर्बाधणी करण्याची गरज असताना, त्यांचे नेतृत्व आणि राहुल गांधी यांची उत्साही भूमिका हे दोन्ही अतिशय महत्त्वाचे आहेत.
भविष्यात ते साहजिकच पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळतील, असे कुमार म्हणाले.पक्षासमोरील मुद्दे हाताळताना सोनिया व राहुल यांच्यात तफावत आढळते हे पक्षाच्या काही नेत्यांचे म्हणणे तुम्हाला मान्य आहे काय, या प्रश्नाचे उत्तर कुमार यांनी नकारार्थी दिले.

‘सोनियांनी अध्यक्षपद सोडू नये’
बारनेर: राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारावे ही चर्चा सुरूअसतानाच, राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी सोनियांनी अध्यक्षपदी कायम राहावे ही तळागाळातील कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे वक्तव्य केले आहे. इंदिरा गांधी यांच्यानंतर सोनियांच्या नेतृत्वात काँग्रेसची दोन वेळा सत्ता आल्याची आठवण पायलट यांनी करून दिली. माजी केंद्रीयमंत्री कमलनाथ यांनी राहुल यांच्या अध्यक्षपदाबाबत वक्तव्य केल्याचे निदर्शनास आणून देताच, कोण काय बोलले हे माहीत नाही, असे उत्तर पायलट यांनी दिले.