काँग्रेस खासदार संजय सिंग यांचा मुलगा अनंत विक्रम सिंग यांचे समर्थक आणि पोलीस यांच्यात झालेल्या हाणामारीत रविवारी एका पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला. या हाणामारीत अन्य सहा जणसुद्धा जखमी झाले आहेत. यावेळी संतप्त जमावाकडून करण्यात आलेल्या गोळीबारात हवालदाराचा विजय मिश्रा (४५) मृत्यू झाल्याची माहिती पोलीस अधिक्षक मुन्नालाल यांनी दिली. सिंग घराण्याच्या अमेठी येथील ‘भूपती निवास’ या वडिलोपार्जित निवासस्थानी अनंत विक्रम सिंग हे या ठिकाणी त्यांची आई आणि संजय सिंग यांची पहिली पत्नी गरिमा यांच्याबरोबर राहत आहेत. काही दिवसांपूर्वी संजय सिंग यांनी दुसरे लग्न केल्यामुळे निवासस्थानाच्या मालकीवरून पिता-पुत्रांमध्ये वाद सुरू आहेत. रविवारी सकाळी संजय सिंग आणि त्यांची दुसरी पत्नी अमिता या ठिकाणी आल्याचे कळताच अनंत विक्रम सिंग यांच्या समर्थकांनी निवासस्थानाबाहेर गर्दी केली होती. त्यावेळी पोलिसांनी अनंत विक्रम सिंग यांच्या समर्थकांना गर्दी करण्यास मज्जाव केला असता, पोलीस आणि समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. या झटापटीदरम्यान, प्रक्षुब्ध जमावाकडून हवालदार विजय मिश्रा यांच्यावर गोळी झाडण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीसांकडून लाठीहल्ला, अश्रुधूर आणि रबरी गोळ्यांचा वापर करण्यात आला. यामध्ये सहा जण जखमी झाल्याची माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली.