अनुदानित सिलिंडर खरेदी करण्यासाठी आधार कार्डची काहीही आवश्यकता नसल्याचे केंद्र सरकारने शुक्रवारी लोकसभेमध्ये स्पष्ट केले. अनुदानित सिलिंडरचे वितरण आणि आधार कार्डशी जोडलेले खाते याचा संबंध तोडण्यासाठीचा आदेश आठवड्याभरात काढण्यात येईल, असेही सरकारने सांगितले.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी ही माहिती दिली. अनुदानित सिलिंडरवरील अंशदान थेट ग्राहकाच्या बॅंक खात्यात जमा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने रद्द केला आहे. त्यामुळेच आता आधार कार्डशी जोडलेल्या खात्याशिवाय ग्राहक थेटपणे आपल्या एजन्सीकडून अनुदानित सिलिंडर खरेदी करू शकतात, असे मोईली यांनी सांगितले.
अंशदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा करण्याबद्दल बॅंकांच्या पातळीवर काही अडचणी होत्या. त्यामुळेच सरकारने ही योजना रद्द करण्याचा निर्णय घेतला, असेही मोईली म्हणाले.