मुस्लिम समाजाचा वादग्रस्त धर्मगुरू झाकीर नाईकला सौदी अरेबियाचे नागरिकत्व देण्यात आल्याचे वृत्त ‘टाइम्स नाऊ’ने दिले आहे. इंटरपोलपासून बचावासाठी नाईकने सौदीच्या नागरिकत्वाचा आग्रह धरला होता, असे बोलले जाते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सौदीने नाईकचा अर्ज मंजूर केला आहे. नाईकची स्वंयसेवी संस्था इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर (आयआरएफ) सरकारने बंदी घातली आहे. काही दिवसांपूर्वी न्यायालयानेही नाईकच्या संस्थेवर बंदीचा निर्णय कायम ठेवला होता. भारताच्या सुरक्षेला धोका असल्यामुळे आयआरएफवर बंदी घालण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले होते.

सौदीचे राजे सलमान यांनी याप्रकरणी वैयक्तिक लक्ष घालून नाईकला नागरिकत्व दिल्याचे सूत्रांकडून समजते. इंटरपोलकडून अटकेपासून बचावासाठी नागरिकत्व दिल्याचे बोलले जाते. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) नाईकविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी करावी यासाठी तयारी सुरू केल्यानंतर एका आठवड्यात या सर्व घडामोडी घडल्या आहेत. नाईकविरोधात एकदा रेड कॉर्नर नोटीस जारी झाल्यास त्याला फरारी समजून जगातील कोणतीही सुरक्षा यंत्रणा कुठूनही अटक करू शकते.

बांगलादेशची राजधानी ढाका येथे गतवर्षी काही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यातील काही हल्लेखोरांनी आपल्याला झाकीर नाईकपासून प्रेरणा मिळाल्याचे म्हटले होते. त्यामुळे ५१ वर्षीय नाईक अटक होऊ नये म्हणून भारत सोडून गेला होता. ढाका हल्ल्यानंतर एनआयएने नाईक आणि त्याच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन संस्थेच्या काही पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एनआयए लवकरच इंटरपोल आणि सीबीआयला पत्र लिहून नाईकविरोधात रेडकॉर्नर नोटीस जारी करण्याची मागणी करणार होती.