त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी सोशल मीडियावर पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. रॉय यांनी लाऊड स्पीकरवरील अजानची तुलना दिवाळीतील फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाशी केली आहे. प्रत्येक दिवाळीत फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे वाद होतो, वर्षांतून काही दिवसच हे फटाके वाजवले जातात. पण दररोज सकाळी साडेचार वाजता लाऊडस्पीकरवरून होणाऱ्या अजानबाबत कोणी काहीच बोलत नाही, असे ट्विट त्यांनी केले. फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषण होते, असे म्हणणाऱ्यांना त्यांनी हा प्रश्न विचारला आहे.

ते पुढे म्हणतात की, लाऊडस्पीकरवरून अजानमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर सेक्यूलर लोकांचे मौन आश्चर्यकारक वाटते. कुराण किंवा हदिसमध्ये लाऊडस्पीकरवर अजान करण्याबाबत सांगितलेले नाही. मुअज्जिनच्या मिनारवर मोठ्या आवाजात अजान करता यावी यासाठी हे मिनार बांधण्यात आले आहेत. लाऊडस्पीकरचा वापर इस्लामविरोधात आहे, असेही त्यांनी म्हटले.

पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारने दिवाळीत रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत तीव्र आवाजाच्या फटाक्यांवर बंदी घातली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही दिल्लीत फटाक्यांवर बंदी घातली आहे. नेमके याचवेळी रॉय यांनी हे वक्तव्य केले आहे.

‘इंडिया टुडे’बरोबर बोलताना रॉय म्हणाले, एक हिंदू म्हणून मी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर खूश नाही. कारण उत्सवाच्या एका महत्वपूर्ण गोष्टीवर बंधन लादण्यात आले आहे. भविष्यात वायू प्रदूषणाचे कारण देऊन हिंदूंच्या अंतिम संस्कारावरही बंदी लादली जाऊ शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

अनेक मुद्यांवर कठोर भुमिका घेणाऱ्या रॉय यांनी रोहिंग्या शरणार्थींना ‘कचरा’ संबोधून नवा वाद निर्माण केला होता. याप्रकरणी त्यांनी ट्विट केले होते. कोणताी इस्लामिक देश रोहिंग्यांना स्वीकारण्यास तयार नाही. पण भारत त्यांच्यासाठी एक महान धर्मशाळा आहे. जर तुम्ही नकार दिला तर त्याला अमानवीय व्यवहार समजला जाईल, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.