उत्तर प्रदेशात काय होईल, याचा काही नेम नाही. असेच एक चमत्कारिक उदाहरण नुकतेच समोर आले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांना प्रभावित करण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असलेल्या आठवीतील एका मुलाला चक्क प्राथमिक शाळेतील मुलांच्या चमूसोबत बसविण्यात आले. हे प्रकरण उघड झाल्यानंतर आता राज्य सरकारने त्याची दखल घेतली असून, चौकशीचे आदेश दिले आहेत.
क्लिंटन गेल्या आठवड्यात १७ जुलै रोजी जबरौली येथील प्राथमिक शाळेला भेट देणार होते. त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी शाळेतील मुलांचा एक गट तयार करण्यात आला. याच गटात एका खासगी इंग्रजी शाळेत शिकणाऱया आठवीतील मुलाला बसविण्यात आले. शाळा सोडल्याचा दाखला आणि गुणपत्रिका याची कोणतीही मागणी न करता थेटपणे त्या विद्यार्थ्याला प्राथमिक शाळेत प्रवेश दिल्याचे दाखविण्यात आले. त्या मुलाला प्राथमिक शाळेचा गणवेशही देण्यात आला. जेणेकरून तो त्याच शाळेचे विद्यार्थी आहे, असे वाटावे.
दरम्यान, खासगी शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की संबंधित मुलाच्या पालकांनी १७ जुलै रोजी एक दिवसाची सुटी मागण्यासाठी शाळेकडे अर्ज केला होता.