संसदेच्या दोन्ही सभागृहात सोमवारीदेखील धर्मांतराचा मुद्दा गाजताना दिसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याविषयी बाळगलेले मौन आजही विरोधकांच्या टीकेच्या केंद्रस्थानी होते. यावेळी तृणमुल काँग्रेसचे राज्यसभेतील नेते डेरेक ओब्रायन यांनी मोदींच्या यापूर्वीच्या प्रचारसभेतील विधानांचा आधार घेत सरकारवर निशाणा साधला. संसदेत येण्यासाठी पंतप्रधानांना ५६ इंचाच्या छातीची नव्हे, तर चार इंचाच्या काळीजाची गरज आहे, असा खोचक सल्ला त्यांनी सरकारला दिला. आम्ही धर्मांतराविषयीच्या चर्चेपासून कोणत्याही प्रकारे पळत नाही. मात्र, ही चर्चा पंतप्रधानांच्या उपस्थितीत व्हावी, ही आमची मागणी मान्य करावी, असे त्यांनी सांगितले. तर समाजवादी पक्षाचे नेते नरेश अग्रवाल यांनी सभागृहाचे नियोजित काम मागे ठेवून धर्मांतराच्या मुद्द्यावरून चर्चा आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला. या मुद्द्यावरून पेचात सापडलेले नरेंद्र मोदी चर्चेपासून दूर पळत असल्यामुळेच सभागृहात ही परिस्थिती ओढविल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. मात्र, केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी हे सर्व आरोप फेटाळत हा मुद्दा या अगोदरच संसदेत उपस्थित झाल्यामुळेच विरोधकांच्या मागणीचा विचार करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे सांगितले.