धर्मांतर बंद करण्यासाठी कडक कायदा आणला पाहिजे, अशी मागणी करतानाच विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण तोगडिया यांनी घरवापसी सुरूच ठेवावी, असे वादग्रस्त मत मांडले आहे.
विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळ आणि व्यवस्थापन समिती यांची बैठक सोमवारी हैदराबादमध्ये झाली. या बैठकीनंतर त्यामध्ये झालेल्या चर्चेबद्दल माहिती देताना तोगडिया म्हणाले, आम्ही धर्मांतरणाच्या विरोधात आहोत. पण जर कोणी स्वच्छेने जगण्याचा वेगळा मार्ग निवडत असेल, तर त्याला धर्मांतर म्हणता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयानेही हिंदूत्त्व हा एक जगण्याचा मार्ग असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हा मार्ग कोणी स्वीकारत असेल, तर त्याला आम्ही थांबवू शकणार नाही. धर्मांतरामुळे व्यक्ती राष्ट्रीय प्रवाहापासून दूर जातो, असे आमच्या विश्वस्त मंडळाला वाटते. पण घरवापसीच्या माध्यमातून तीच व्यक्ती पुन्हा राष्ट्रीय प्रवाहात सामील होते.
केंद्र सरकारने धर्मांतराविरोधात कडक कायदा केला पाहिजे, अशीही मागणी विश्वस्त मंडळाने केली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, घरवापसी ही पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे. इतिहासातील अनेक थोर व्यक्तींनी याचे समर्थन केले होते, त्यामुळे घरवापसी सुरूच ठेवावी, असे मत त्यांनी मांडले.