उद्योजकांकडून बडे राजकारणी, नोकरशहा आणि पत्रकार यांची मर्जी कशी राखली जाते याचे उदाहरण एस्सार समूहाच्या रूपाने पुढे आले असून नितीन गडकरी, दिग्विजय सिंग, मोतीलाल व्होरा, वरुण गांधी आदी अनेकांना कंपनीने उपकृत केल्याचे त्यातून स्पष्ट होते. नितीन गडकरी यांनी तर या कंपनीच्या फ्रेंच रिव्हिएरात नांगरून असलेल्या शाही नौकेत सहकुटुंब सहपरिवार पाहुणचार झोडल्याचेही त्यातून दिसते. गडकरी यांच्यावर कंपनीचे इतके प्रेम की या पाहुणचारासाठी त्यांना फ्रान्समधील नाइस येथून खास हेलिकॉप्टरद्वारे या नौकेवर नेण्यात आले.
बडय़ा शिफारसींबाबत ‘एस्सार’चे मार्गदर्शन
कंपनीच्या एका जागल्यानेच (व्हीसलब्लोअर) ही खळबळजनक माहिती दिली असून, याबाबत ‘सेंटर फॉर पब्लिक लिटिगेशन’तर्फे सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात येणार आहे. या माहितीनुसार, नितीन गडकरी यांनी ७ ते ९ जुलै २०१३ यादरम्यान फ्रान्सची सहल केली होती. त्या वेळी त्याच्यासोबत त्यांची पत्नी कांचन, पुत्र निखिल आणि सारंग, कन्या केतकी होते. सनरेज या पंचतारांकित यॉटवर (शाही नौका) या सर्वाची खास बडदास्त ठेवली होती. मात्र गडकरी तेव्हा कोणत्याही मंत्रिपदावर नव्हते. भाजपच्या अध्यक्षपदावरून ते नुकतेच पायउतार झाले होते. मात्र कंपनीने त्यांचा अत्यंत शाही पाहुणचार केला. त्यांना फ्रान्समधील नाइस विमानतळावरून खास हेलिकॉप्टरने या यॉटवर नेण्यात आले.
याबाबत गडकरींशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की ‘मी नॉर्वेला सहकुटुंब गेलो होतो. त्याचा खर्च मी स्वत: केला होता. रुईयांसोबत मी त्यांच्या यॉटवर गेलो होतो. परंतु रुईयांशी आमचे गेल्या २५ वर्षांचे संबंध आहेत. रुईया हे आमचे मुंबईत अनेक वर्षांचे शेजारी आहेत. मी तेव्हा युरोप दौऱ्यावर असल्याचे त्यांना समजल्यामुळे त्यांनी मला निमंत्रण दिले. तेव्हा मी भाजपचा अध्यक्ष नव्हतो किंवा खासदारही नव्हतो. त्यामुळे त्यांना काही माझ्यामुळे फायदा होण्याची शक्यता नाही. फ्रान्सची सहल ही माझी वैयक्तिक बाब आहे.’ रुईयांची स्वमालकीची बोट असल्यामुळे कोणाला काही पैसे देण्याची गरज नव्हती. त्या बोटीवर हेलिकॉप्टरने जावे लागत असल्यामुळे आम्ही ते वापरले, असेही गडकरी म्हणाले.
गडकरी यांच्याबरोबरच तत्कालीन कोळसा मंत्री श्रीप्रकाश जैसवाल, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह, मोतीलाल व्होरा, खासदार यशवंत नारायणसिंह लागौरी, भाजप नेते वरुण गांधी यांनीदेखील एस्सार समूहात नोकरीसाठी अनेकांची शिफारस केल्याचे या जागल्याने दिलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे.
जैसवाल यांनी काही लोकांची एस्सारकडे शिफारस केल्याचे मान्य केले. आपण मतदारसंघातील बेरोजगार उमेदवारांची अनेकदा शिफारस करतो, असे त्यांनी सांगितले.
दिग्विजय सिंग यांनी मात्र अशी शिफारस केल्याचे आठवत नाही, असे म्हटले आहे. परंतु गरजूंना आपण नेहमीच मदत करतो, असेही त्यांनी सांगितले. वरुण गांधी यांनीही याचीच री ओढली. संबंधित व्यक्तीचे नाव आठवत नसल्याचे ते म्हणाले, मात्र उच्चशिक्षित उमेदवारांना माझ्या कार्यालयाकडून शिफारस पत्रे दिली जातात, हे त्यांनी मान्य केले. लागौरी प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत.
एस्सार समूहाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शासकीय अधिकारी तसेच खासदारांसाठी अत्याधुनिक २०० मोबाइल फोन भेट म्हणून देण्याचा प्रस्ताव एका ईमेलद्वारे दिल्याची माहितीही उघड झाली आहे. तसेच काही पत्रकारांसाठी एका प्रकरणात दहा दिवस टॅक्सी सेवा दिल्याची माहिती त्यात होती. एस्सार समूहाने अशा सर्व बाबींची नोंद ठेवली आहे.
दरम्यान, याबाबत एक्स्प्रेस समूहाने एस्सार समूहाशी संपर्क साधला असता, आमच्या कार्यालयातील काही माहितीची चोरी झाली असून, त्याची तक्रार पोलिसात केली आहे. यापैकी काही तपशिलांचा विपर्यास केला असून, काही आरोप हे त्यातून चुकीचे अर्थ काढून केलेले आहेत, असे एस्सारच्या प्रवक्त्याने म्हटले.

एस्सार समूहातील पत्रव्यवहार एका जागल्याने (व्हीसलब्लोअर) उघडकीस आणून बडे उद्योगसमूह राजकारणी, सरकारी अधिकारी, तसेच पत्रकारांवर आपले अनेक हेतू साध्य करण्यासाठी कशी कृपादृष्टी ठेवतात हे उघडकीस आणून एकच खळबळ उडवून दिली. या माहितीच्या आधारे ‘सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटीगेशन’ लवकरच सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे. बडय़ा उद्योगांचा हा व्यवहार कसा होतो, त्याबाबतचे पत्रव्यवहार कसे होतात, याबाबत उपलब्ध झालेल्या कागदपत्रांतून उघड झालेली माहिती..
‘पाहुणे अतिमहनीय आहेत.. त्यांची चोख बडदास्त ठेवा’
‘एकूण नऊ जण असतील, ते तुमच्याबरोबर दोन रात्री राहतील..’ असा ई मेल ३० जून २०१३ रोजी सनरेजच्या कप्तानांना आला. तो एस्सार समूहाच्या अध्यक्षांच्या कार्यालयातून आला होता. हा संदेश स्पष्ट होता. नऊ प्रवासी दोन रात्री सनरेज नौकेवर राहणार होते. यापुढील सूचनांची कप्तान वाट पाहात होता. सनरेज ही साधेसुधी नौका नव्हती. त्यावर दाखल होणारे प्रवासीही सामान्य नव्हते. मौजमजेसाठी एस्सारच्या उपाध्यक्षांच्या या नौकेची बांधणी करण्यात आली आहे. या ८५ मीटर लांबीच्या शेवाळी आणि पांढुरक्या रंगाच्या नौकेची निर्मिती काटेकोरपणे करण्यात आली आहे. धातू आणि लाकूडकामाचा हा एक सुरेख नमुना म्हणावा लागेल. नौकेवरील मसाज रुम अतिशय अलिशान आहे.
त्याच दिवशी आणखी एक ई मेल आला. ‘श्री.नितीन गडकरी (भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष ) हे सध्या युरोपमध्ये आहेत. त्यांना सनरेजवर दोन-तीन दिवस राहायला आवडेल..सनरेजकडे येण्यासाठी गडकरी व इतरांना निश्चितपणे कोठे यावे लागेल हे मला स्पष्ट करा. ते नाइस येथे येण्यात काही अडचण नाही ना ? का त्यांची व्यवस्था इतरत्र करणे योग्य ठरेल?’ सनरेज नौका फ्रान्सच्या किनारपट्टीतील ब्युल्यू सुर-मेर या गावात तळ ठोकणार होती.
५ जुलैला कप्तानाला आणखी एक ई मेल आला. ‘पाहुणे मंडळी नाइस येथे ७ जुलैच्या दुपारी येणार आहेत, ९ जुलैपर्यंत त्यांचा मुक्काम असेल. त्यांना नाइस येथून ७ जुलैला घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यात यावी..सर्व नऊ प्रवासी हे शाकाहारी आहेत..हे लक्षात घेऊन त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात यावी.नियोजित कार्यक्रमामुसार कप्तानाने गडकरी कुटुंबीयांना नाइस विमानतळावरून हेलिकॉप्टरने सनरेज नौकेवर आणण्याची ७ जुलैला व्यवस्था केली आणि ९ जुलैला त्यांचा परतीचा प्रवास सुरळीत होईल याचीही खबरदारी घेतली. दोन रात्री सनरेजवरील पाहुणचार घेणाऱ्या या नऊ जणांमध्ये दस्तुरखुद्द गडकरी, त्यांची पत्नी कांचन, त्यांची मुले निखिल आणि सारंग तसेच मुलगी केतकी यांचा समावेश होता. निखिल आणि सारंग यांचे दूरध्वनी क्रमांक एस्सारच्या कार्यालयातील संपर्कासाठीच्या यादीत आहेत. गडकरी कुटुंब ७ जुलै रोजी सनरेजवर आल्यानंतर पुन्हा ई मेलची देवाणघेवाण झाली. एस्सारच्या एका अधिकाऱ्याने शेवटच्या क्षणी कप्तानाला आठवण करून देण्यासाठी पुढील संदेश पाठविला..‘आपल्या चर्चेनुसार  येणारे पाहुणे हे अति महनीय आहेत. त्यांची बडदास्त ठेवली जाईल याची खबरदारी घ्या.’ रात्रौ ७.३२ ला कप्तानाने ब्लॅकबेरीद्वारा एक संदेश पाठविला. सर्व पाहुणे सनरेजवर पाऊण तासापूर्वी आले आहेत. कृपया पुढील सूचना द्या..’ राजकारण्यांना भारी मोबाइल, तर पत्रकारांसाठी वाहनव्यवस्था
२००९चा जून. यूपीए दुसऱ्यांदा सत्तेवर आली तो काळ. एस्सारच्या अधिकाऱ्यांनी त्या वेळी एक मेमो काढला होता. त्यात प्रस्ताव होता देशातील काही राजकीय नेते आणि खासदार यांना अतिशय महागडे असे २०० मोबाईल फोन देण्याचा. त्यात पुन्हा दर महिन्याला देण्यात येत असलेल्या ‘भेटीं’चा समावेश होताच.
त्या मेमोमध्ये म्हटले होते :  ‘‘केंद्रात यूपीएचे नवे सरकार सत्तेवर आले आहे. त्यांची नवी खेळी सुरू होत आहे. आपल्याला योग्य ठिकाणी असलेल्या योग्य माणसांमध्ये गुंतवणूक करून दूरगामी लाभ कमावायचा तर त्यासाठी हीच योग्य संधी आहे. मी हे पाहिले आहे, की त्यातील अनेक जण, खासकरून तरूण खासदार हे तंत्रस्नेही आहेत. पारंपरिक पद्धतीने पत्रव्यवहार करण्याऐवजी ते ई-मेल आणि एसएमएस वापरतात. त्यांच्यामध्ये घुसण्यासाठी आपल्याला योग्य रणनिती आखली पाहिजे आणि हे लक्षात घेऊनच त्यातील काही मान्यवर नेत्यांना, तसेच काही वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना २०० उच्च प्रतीचे मोबाईल फोन भेट म्हणून द्यावेत. त्या फोनमध्ये मासिक पाच हजार रुपयांचा ‘टॉकटाइम’ असलेले सीम कार्डही असेल.’’
  राजकारण्यांप्रमाणेच पत्रकारांनाही अशाच प्रकारे उपकृत करण्यात आल्याचे दिसले आहे. वर्तमानपत्रांत बातम्या पेरणे, तसेच पोलाद मंत्रालयासारख्या मंत्रालयांच्या पत्रकार परिषदांमध्ये विचारण्यासाठी आपल्या पुठ्ठय़ातील पत्रकारांना प्रश्न पुरविणे हे प्रकारही करण्यात येत असल्याचे उल्लेख आहेत.
एस्सारच्या दिल्लीतील एका अधिकाऱ्याने २० जुलै २०१२ रोजी पाठविलेल्या एका ई-मेलचा विषय होता – ‘उद्या कोण काय छापणार आहे ते शक्य असल्यास जाणून घेण्यायोग्य आहे?’ त्यात पुढे म्हटले होते, ‘‘आजच्या गुजरात सरकारच्या कारवाईसंदर्भात आपण एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे हे तुम्हाला माहितच आहे.. माझी अशी सूचना आहे की सगळ्या वृत्तपत्रांतील संपादकीय विभागातील पत्रकारांना गाठून उद्याच्या बातमीचे मथळे आपल्या बाजूने झुकणारे किंवा कमीत कमी निपक्षपाती तरी असतील हे पाहावे.’’ या मेलमध्ये विरोधात बातम्या छापणाऱ्या एका आर्थिक दैनिकाचा उल्लेख असून, त्यांचा सूर मवाळ होईल असे पाहण्याचा सल्लाही आहे.
एवढेच नव्हे तर एस्सार नियमितपणे दिल्लीतील काही कर्मचाऱ्यांची वाहनव्यवस्थाही करीत असल्याचे समोर आले आहे. कंपनीच्या वाहन मागणी फॉर्ममध्ये त्यांची नावे आढळून आली आहेत.