राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची स्पष्टोक्ती

विविधता, सहिष्णुता आणि विभिन्नता या मूलभूत मूल्यांवर भारताचे ऐक्य अनेक शतके टिकून असून ही मूल्ये वाया जाता कामा नयेत, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी बुधवारी केली. गोमांस बाळगल्याच्या संशयावरून उत्तर प्रदेशातील दादरी येथे २८ सप्टेंबरला महम्मद अखलाख यांची जमावाने हत्या केल्याच्या पाश्र्वभूमीवर मुखर्जी यांनी हे प्रतिपादन केले .
मुखर्जी म्हणाले की, अनेक प्राचीन संस्कृतींचा ऱ्हास झाला. मात्र आक्रमणामागून आक्रमणे होऊनही आणि परकीय सत्तेच्या जोखडाखाली प्रदीर्घ काळ राहूनही भारतीय संस्कृती टिकली, याचे कारण बंधुभाव, सहिष्णुता आणि विविधतेचा स्वीकार हेच आहे. जोवर या मूल्यांची जपणूक सुरू राहील तोवर भारतीय लोकशाहीला कोणताही धोका नाही, असेही राष्ट्रपतींनी नमूद केले.
राष्ट्रपतींवरील कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात झाले. राष्ट्रपती मुखर्जी हे भारतीयत्वाचे प्रतीक आहेत, असे गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काढल्यानंतर राष्ट्रपती बोलत होते.
विविधता आणि सहिष्णुता या राष्ट्र म्हणून भारताच्या मध्यवर्ती कल्पना आहेत आणि त्या घटनेत प्रतिबिंबित झाल्या आहेत. त्या प्रत्येकाने लक्षात ठेवाव्यात. कुठल्याही परिस्थितीत या तत्त्वांचे पालन हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असेही राष्ट्रपती म्हणाले.
मोदींचे संवेदनशील मौन
पंतप्रधान मोदी हे संवेदनशील आहेत. त्यांनी समाज माध्यमांत काय लिहिले वा लिहिले नाही, यावरून निष्कर्ष काढू नयेत, असे भाजपने बुधवारी स्पष्ट केले. दादरी घटनेबाबत मोदी यांनी मौन बाळगल्यावरून होत असलेल्या टीकेबाबत पक्ष सरचिटणीस सिद्धार्थनाथ सिंग यांनी ही प्रतिक्रिया दिली. दादरी घटनेबाबत पक्षाने आणि सरकारने विविध पातळ्यांवर मतप्रदर्शन केले आहे आणि आवश्यक ती कार्यवाही केली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.