दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमधील पूंछ येथे प्रत्यक्ष सीमारेषेवर बुधवारी भारतीय जवानांनी दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी देशातील नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी या जवानांप्रती प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली. ‘देशवासीयांनी मोठ्या उत्साहात निर्धास्तपणे दिवाळी साजरी करावी, शत्रूशी लढण्यास आम्ही येथे तयार आहोत’ असे शुभेच्छा देताना या जवानांनी म्हटले आहे.


भारतीय लष्कर हे देशाच्या संरक्षणाचा एक मजबूत स्तंभ आहे. वर्षभर त्यांच्यावर देशातील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असते. देशभरात सध्या लोक आपापल्या कुटुंबियांसोबत घरी दिवाळी साजरी करीत आहेत. अशा वेळी शत्रूच्या मनात काय असेल सांगता येत नाही, म्हणून आपले जवान शत्रूंशी दोन हात करण्यासाठी सीमेवर तैनात आहेत.

दरम्यान, सीमेवर दिवे प्रज्वलित करुन या जवानांनी आपली दिवाळी साजरी केली. मात्र, आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवत. देशाच्या नागरिकांनाही कुठल्याही काळजीशिवाय दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा संदेशही दिला आहे.