आपण खोटा गुन्हा नोंदविल्याचे एका विधवा महिलेने न्यायालयात स्पष्ट केल्याने त्या विधवेवर बलात्कार केल्याच्या आरोपातून दिल्ली न्यायालयाने एका व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली. आपल्या वकिलाने धमकी दिल्याने आपण खोटी तक्रार नोंदविली होती, अशी कबुली या महिलने दिल्याने विशेष शीघ्रगती न्यायालयाने दिल्लीतील नागरिक मणिंदरसिंग दाहिया याची निर्दोष मुक्तता केली.
सदर महिलेने सादर केलेल्या पुराव्यात बलात्कार हा शब्दप्रयोगही केला नाही, त्याचप्रमाणे दाहिया यांच्या विरोधात कोणताही पुरावा दिला नाही, त्यामुळे दाहिया यांची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश अतिरिक्त सत्र न्यायमूर्ती निवेदिता अनिल शर्मा यांनी दिला.
मणिंदरसिंग दाहियाने सदर महिलेवर ऑगस्ट ते डिसेंबर २०१२ या कालावधीत अनेकदा बलात्कार केला. इतकेच नव्हे तर तिला गुंगीचे औषध पाजून तिची अश्लील छायाचित्रेही काढली, असा आरोप पोलिसांनी केला होता.
तथापि, आपण मणिंदरसिंगला गेल्या ५-६ वर्षांपासून ओळखतो आणि त्याने आपल्याला वेळोवेळी आर्थिक मदत केली आहे, असे सदर महिलेने सुनावणीच्या वेळी न्यायालयास सांगितले. त्यानंतर आपल्या वकिलांनी दाहियाविरुद्ध तक्रार नोंदविली. आपण सांगितल्यानुसार जबानी न दिल्यास फौजदारी खटल्यात गोवण्याची धमकी आपल्याला वकिलांनी दिली, असेही या महिलेने न्यायालयात सांगितले.