मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अबू जुंदाल याच्यावरील आरोपपत्रावर २४ मार्चपासून युक्तिवाद करण्यात येईल, असे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने सांगितले.
जिल्हा न्यायाधीश आय. एस. मेहता यांनी जुंदालच्या आरोपपत्रावरील सुनावणीची तारीख निश्चित केली आहे. एनआयएने आरोपपत्राची एक कॉपी जुंदालचे वकील एम. एस. खान यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर ही तारीख निश्चित करण्यात आली. जुंदालवर भारतामध्ये दहशतवादी कारवाया करण्याचा मुख्य आरोप ठेवण्यात आला आहे. सध्या मुंबईतील आर्थर रोड कारागृहात असलेल्या जुंदालने न्यायालयात सुनावणीपूर्वी एनआयए आणि महाराष्ट्र पोलिसांनी जबरदस्तीने काही कागदपत्रांवर आपल्या सह्या घेतल्याचा आरोप केला आहे.
जुंदाल आणि त्याचा सहकारी फय्याज कागजी यांनी २००५मध्ये लष्कर-ए-तय्यबा या संघटनेद्वारे दहशतवादी कारवायांना सुरुवात केली. त्यानंतर ते नेपाळमध्ये गेले आणि अब्दुल अजीज याच्याकडे त्यांनी बॉम्बस्फोट घडवण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर जुंदाल पाकिस्तानात गेला. कराची येथील लष्कर-ए-तय्यबाच्या मुख्यालयात तो काही दिवस राहिला होता, असे एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे.