टूजी घोटाळाप्रकरणी दिल्लीतील विशेष न्यायालयाने शुक्रवारी माजी दूरसंचार मंत्री ए. राजा, डीएमकेच्या खासदार कनिमोळी यांच्याविरुद्ध आरोप निश्चित केले. स्वान टेलिकॉमचे प्रवर्तक शाहिद उस्मान बलवा आणि डीएमकेचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांची पत्नी दयालू अम्मा यांच्याविरुद्धही आरोप निश्चित करण्यात आले आहेत. या सर्वांनी आपण दोषी नसल्याचा युक्तिवाद न्यायालयापुढे केला असून, याप्रकरणी सुनावणी घेण्याची मागणी न्यायालयाकडे केली.
एकूण १९ आरोपींविरुद्ध न्यायालयाने आरोप निश्चित केले. प्राथमिक माहितीनुसार या सर्वांविरुद्ध पैशांची अफरातफर केल्याचे आरोप निश्चित होत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानुसार भारतीय दंडविधान संहितेच्या कलम १२०-ब आणि यासंदर्भातील इतर कायद्यांच्या आधारे या सर्वांवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.