जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील(जेएनयू) कथित देशविरोधी घोषणांप्रकरणी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याला दिल्लीच्या पटियाळा सत्र न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. त्याच्यासोबत त्याचे सहकारी उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांची देखील न्यायालयाने जामीनावर सुटका केली. ‘जेएनयू’मध्ये ९ फेब्रुवारी रोजी दहशतवादी अफझल गुरूच्या समर्थनार्थ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भारताविरोधात घोषणाबाजी करण्यात आल्याचा आरोप कन्हैय्या आणि त्याच्या सहकाऱ्यांवर करण्यात आला होता. या प्रकरणी कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य या सर्वांवर सध्या देशद्रोहाचा आरोप असून, ते अंतरीम जामीनावर बाहेर होते. अंतरीम जामीनातील अटी कायम ठेवत पटियाळा न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला. या आरोपींनी तपासामध्ये पोलिसांना सहकार्य केल्यामुळे तसेच अंतीरीम जामीनातील अटींचे पालन केल्यामुळे त्यांना जामीन मिळावा, अशी दिल्ली पोलिसांनी पटीयाला न्यायालयाचे न्यायाधीश रितेश सिंह यांच्याकडे अर्जाद्वारे विनंती केली होती. यापूर्वी कन्हैया कुमारने सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर सर्वोच्‍च न्‍यायालयाने पटियाळा हाउसची परिस्‍थिती पाहाता तुम्‍ही उच्‍च न्‍यायालयात दाद मागा, असे म्हटले होते. कैन्हेया कुमारला २ मार्चला सहा महिन्याचा अंतीरीम जामीन मंजूर करण्यात आला होता.