नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पाचारण करण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयाने २ डिसेंबपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
या खटल्यातील युक्तिवाद सोमवारी संपुष्टात येणार नाही, असे गांधी यांच्या वकिलांनी न्यायालयात स्पष्ट केल्यानंतर न्या. व्ही. पी. वैश यांनी अंतरिम आदेशाला मुदतवाढ दिली.
या प्रकरणी सादर करण्यात आलेल्या याचिकांवर सलग दोन-तीन दिवस सुनावणी घेण्याची गरज आहे. न्यायालयाकडे अनेक प्रकरणे वर्ग करण्यात आल्याने आणि सुटीचा कालावधी असल्याने येत्या काही दिवसांत याबाबत सुनावणी घेणे शक्य नाही, असे स्पष्ट करून उच्च न्यायालयाने ही सुनावणी २ डिसेंबपर्यंत पुढे ढकलली.
भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी, या प्रकरणात काँग्रेसच्या नेत्यांनी फसवणूक आणि मोठय़ा प्रमाणावर निधीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. सोनिया आणि राहुल गांधी यांच्यासह मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नाडिस आणि सुमन दुबे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.