मणिपूरमधील ‘अॅफ्स्पा’ कायद्याच्या विरोधात गेली तब्बल १४ वर्षे अन्नसत्याग्रह करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यां इरोम चानू शर्मिला यांची तुरुंगातून सुटका करण्याचा आदेश स्थानिक न्यायालयाने मंगळवारी दिला.
४२ वर्षीय इरोम शर्मिला गेली सुमारे १४ वर्षे अन्नसत्याग्रह करीत आहेत. २००० साली इम्फाळ विमानतळाजवळ आसाम रायफल्स या निमलष्करी दलाने एका चकमकीत १० अतिरेक्यांना ठार केले होते. ही चकमक बनावट असल्याचा आरोप करून शर्मिला यांनी हा अन्नसत्याग्रह सुरू केला होता, परंतु पोलिसांनी हा ‘आत्महत्येचा प्रयत्न’ असल्याचा ठपका ठेवून त्यांना अटक केली होती. त्यांना एका रुग्णालयात ठेवण्यात आले असून त्या खोलीचाच तुरुंग करण्यात आला आहे. त्यांना नळीद्वारे नाकातून अन्नपदार्थ दिले जात आहेत. ‘आम्र्ड फोर्सेस (स्पेशल पॉवर्स) अॅक्ट-१९५८’ या कायद्याखाली त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र या कायद्यानुसार कोणालाही जास्तीत जास्त ३६४ दिवसच अटकेत ठेवता येत असल्याने दरवर्षी त्यांची सुटका करून पुन्हा दुसऱ्या दिवशी अटक केली जाते.
मंगळवारी इम्फाळमधील स्थानिक न्यायालयाने त्यांच्या सुटकेचे आदेश दिले. आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या आरोपातून न्यायालयाने त्यांची मुक्तता केली. इरोम यांचा आत्महत्या करण्याचा इरादा होता हे सिद्ध करण्यात फिर्यादी पक्षाला सपशेल अपयश आले आहे, असे ताशेरेही न्यायालयाने ओढले.