दिल्ली विमानतळाच्या संचालक कंपनीने मद्यसम्राट विजय मल्या यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या धनादेश न वठण्याच्या अनेक प्रकरणांमध्ये त्यांना आरोपी म्हणून पाचारण करण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. कंपनीचे प्रमुख म्हणून मल्या हे खटला भरले जाण्यास तितकेच जबाबदार आहेत, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.

कनिष्ठ न्यायालयाने दिलेला आदेश बेकायदेशीर असल्याचे म्हटले जाऊ शकत नाही, असे सांगून न्यायालयाने मल्या याच्याविरुद्ध जारी केलेले समन्स रद्द करण्यास नकार दिला.

 

गळा दाबल्याने समिया शाहीदचा मृत्यू

इस्लामाबाद : संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत सापडलेली ब्रिटिश-पाकिस्तानी महिला समिया शाहीद ही गळा दाबल्याने मरण पावली होती, असा निष्कर्ष शवविच्छेदन अहवालात निघाला आहे. तिच्या मानेवर ओरखडे दिसले असून तिच्या तोंडातून रक्तही पडले होते त्यामुळे ती ऑनर किलिंगच्या प्रकारात मारली गेली असल्याचा संशय वाढला आहे.

समिया शाहीद (वय २८) हिच्या कुटुंबीयांनी असा दावा केला, की तिचा मृत्यू २० जुलैला पाकिस्तानातील पंजाब प्रांतात झेलम जिल्ह्य़ातील मंगला भागात हृदयविकाराने झाला. तिचा पती सय्यद मुख्तार काझिम याने २३ जुलैला याबाबत तिच्या कुटुंबीयांविरुद्ध खून केल्याचा एफआयआर नोंदवला होता.