न्यायालयाला शरण येण्यास नकार देत पोलिसांविरोधात हिंसक कारवायांचा अवलंब करणारा वादग्रस्त बाबा रामपाल पुन्हा अडचणीत सापडला आहे. २००६ मधील एका खून खटल्यात रामपाल याचा जामीन पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केला असून येत्या २८ नोव्हेंबपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येणार आहे.
न्यायालयाच्या आदेशाला धुडकावून लावत रामपाल याने पोलिसांशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला. दोन आठवडे त्याच्या समर्थकांमध्ये आणि पोलिसांमध्ये संघर्ष सुरू होता. मंगळवारी रामपाल याच्या समर्थकांनी तर पोलिसांच्या कारवाईचा कडवा प्रतिकार केला. मात्र १५ दिवसांच्या कोंडीनंतर हरयाणाच्या हिसार जिल्ह्य़ातील बरवाला येथील आश्रमातून त्याला अखेर बुधवारी रात्री पोलिसांनी अटक केली.  
न्यायमूर्ती एम. जयपॉल आणि न्या. दर्शनसिंग यांच्या पीठाने खून खटल्यातील रामपाल याचा जामीन रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले. रोहटक जिल्ह्य़ातील कैन्थोला येथील आश्रमात झालेल्या संघर्षांदरम्यान एकाचा खून झाला होता, तर इतर अनेक जण जखमी झाले होते. त्या प्रकरणी रामपाल याच्यावर खटला दाखल करण्यात आला होता.  
 रामपाल याचा जामीन अर्ज रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका हरयाणाचे महाधिवक्ता आणि बरवाला पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी केल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय घेतला. रामपाल याला न्यायालयाचा अवमान केल्याच्या गुन्ह्य़ावरून अटक करण्यात आल्याचे या याचिकेत स्पष्ट करण्यात आले होते. यावर न्यायालयाने रामपाल याला तातडीने अटक करण्याचे आदेश दिले. रामपाल याने प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून न्यायालयात हजर राहण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्याच्यावर पांचकुला येथील सरकारी रुग्णालयात गुरुवारी सकाळी काही सक्तीच्या चाचण्या करण्यात आल्या. यात रामपालची प्रकृती ‘स्थिर’ असल्याचा शेरा डॉक्टरांनी मारला. त्यानंतर न्यायालय अवमानप्रकरणी त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.  
‘प्रतिज्ञापत्र सादर करा’
या खटल्याची सुनावणी २८ नोव्हेंबपर्यंत स्थगित करण्यात आली. रामपाल याला त्याच्या आश्रमातून अटक करण्यासाठी केलेल्या कारवाईची तपशीलवार माहिती देणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने हरयाणा पोलीस महासंचालकांना दिले. यात नुकसान, जखमी व्यक्ती, शस्त्रे आणि इतर सामग्री, याशिवाय मालमत्तेचे झालेले नुकसानीचा समावेश आहे.
चौकशीसाठी ‘एसआयटी’
रामपालच्या ‘सत्लोक’ आश्रमात दोन आठवडय़ांच्या कोंडीदरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पाश्र्वभूमीवर त्याच्याविरोधात दाखल केलेल्या काही खटल्यांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक नेमण्याचे आदेश हरयाणा पोलिसांनी दिले आहेत. यात हिसार पोलीस अधीक्षक सतेंदरकुमार गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील पथकात दोन उपअधीक्षक आणि चार निरीक्षक यांचा समावेश असेल, असे पोलीस महानिरीक्षक (हिसार रेंज) ए. के. राव यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. ६३ वर्षीय रामपाल व त्याच्या साथीदारांविरोधात पोलिसांनी ३५ गुन्हे नोंदवले आहेत. देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले. पोलिसांशी संघर्ष करणाऱ्या ४६० अनुयायांना विविध आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारी पोलिसांनी पत्रकारांसह आश्रमात प्रवेश केला, मात्र रामपालला अटक केल्यानंतर त्याच्या अनुयायांनी आश्रम परिसरातून पळ काढल्याचे पोलिसांनी सांगितले.