आंतरजालावर माहिती शोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘याहू’ या सर्च इंजिनने सरत्या वर्षांत कोणकोणत्या बाबींचा सर्वाधिक शोध घेतला गेला याची माहिती जाहीर केली असून, त्यात यंदाचा ‘पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ बनण्याचा मान चक्क गायीला (काऊ या इंग्रजी शब्दाला) मिळाला आहे.
सन २०१५ मध्ये भारतात गायीवरून मोठे रणकंदन माजले होते. महाराष्ट्र सरकारने गोवंश हत्याबंदीचा कायदा करून मोठय़ा वादाला तोंड फोडले. त्यापाठोपाठ दादरी येथील हत्याकांडानंतर गोवंश हत्याबंदीचा मुद्दा देशभर ऐरणीवर आला. त्यानंतर साहित्यिक, विचारवंत आणि कलाकारांनी पुरस्कार वापसीचा सपाटा लावला. या सर्व गोंधळात गायीबद्दलचे कुतूहल सर्वत्र चाळवले गेले आणि त्यातून गायीबद्दलची माहिती मिळवण्यासाठी आंतरजालावर झुंबड उडाली.
गायीखोलोखाल बिहार आणि दिल्ली निवडणुका, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आयसिस, २०१५ वर्ल्ड कप, एपीजे अब्दुल कलाम, शीना बोरा हत्याकांड, व्यापम घोटाळा, सलमान खान, अ‍ॅपलची तांत्रिक उपकरणे यांचा भारतात प्रामुख्याने शोध घेतला गेला. याहूवर महिलांचा शोध घेण्याच्या बाबतीत सनी लिऑनी गेली सलग चार वर्षे आघाडीवर राहिली.