श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन लागतो पण उच्छवासातूनही ऑक्सिजनच देणारा गाय हा एकमेव प्राणी असल्याचे राजस्थानमधील शिक्षण मंत्री वासूदेव देवनानी यांनी म्हटले आहे. गायीचे वैज्ञानिक महत्त्व आपण जाणून घेणे गरजेचे असून त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवायला हवी असेही त्यांनी म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषीविषयक समितीने २००६ मध्ये दिलेल्या अहवालानुसार मिथेन,कार्बन डायऑक्साइड या सारख्या वायूंच्या उत्सर्जनासाठी गायी, म्हशींना जबाबदार ठरवण्यात आले होते. चा-याचे पचन होत असताना ढेकरच्या माध्यमातून हा वायू बाहेर पडत असतो. पण वासूदेव देवनानी यांनी या विधानाच्या विरोधी भूमिका मांडली आहे. अक्षय पात्र फाऊंडेशनच्या वतीने हिंगोनिया गोशाला येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात देवनानी यांनी गाय ऑक्सिजन देते असा दावा केला आहे.

भाजपचे नेते गायीचे गुणगान करण्यात नेहमीच आघाडीवर असतात. पण या नादात वादग्रस्त विधान केल्याने नेते अडचणीतही सापडले होते. राजस्थानमध्ये गोपालन मंत्रालयदेखील तयार करण्यात आले आहे. मात्र त्यानंतरही हिंगोनियामधील गोशाळेत उपचारात दिंरगाई आणि दुर्लक्ष केल्याने गायींचा मृत्यू झाला होता. मध्यप्रदेश आणि हरियाणामधील भाजप सरकारच्या अजेंड्यावरही गायी असतात. मध्यप्रदेशमध्ये तर काही दिवसांपूर्वी पोलिसांना चक्क गायींना चारा देण्याची जबाबदारी देण्यात आली होती.