ंकथित गोरक्षकांच्या हिंसाचाराच्या घटनांशी संबंधित याचिकेवर आज, शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. गोरक्षणाच्या नावाने हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे. पहलू खान यांच्या हत्येप्रकरणी सुनावणी झाली. अशा घटनांमध्ये पीडितांना भरपाई देण्याची गरज आहे. ती सर्व राज्यांची जबाबदारी आहे, असेही न्यायालयाने सांगितले.

 

न्यायालयाच्या आदेशानुसार गुजरात, राजस्थान, झारखंड, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश सरकारने अनुपालन अहवाल दाखल केले आहे. तर इतर राज्यांनीही अहवाल दाखल करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३१ ऑक्टोबरला होणार आहे.

दरम्यान, यावर्षी एप्रिलमध्ये कथित गोरक्षकांनी पहलू खान यांची हत्या केली होती. ते हरयाणातून जनावरे घेऊन राजस्थानातील जयपूरमध्ये जात होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर मुलगाही होता. या प्रकरणी राजस्थान पोलिसांनी नुकतीच सहा आरोपींना क्लीन चिट दिली आहे. या सहा जणांनी मारहाण केल्याचे खान यांनी मृत्यूपूर्वी सांगितले होते. सर्व राज्यांनी हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी योग्य पावले उचलावीत, असे आदेश न्यायालयाने या महिन्याच्या सुरुवातीलाच सर्व राज्यांना दिले होते.