जे प्रत्येक विषयावर ट्विट करतात, त्यांनी दादरी हत्याकांड, कलबुर्गी हत्या या घटनांनंतर लगेचच काही ट्विट का केले नाही, असा सवाल करीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार मोहंमद सलीम यांनी भारत हा फॅसिस्ट विचारांचा देश नसून, लोकशाही देश असल्याचे सोमवारी लोकसभेत सांगितले.
देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावर नियम १९३ अंतर्गत चर्चेला सोमवारी लोकसभेत सुरुवात झाली. चर्चेची सुरुवात मोहंमद सलीम यांनी केली. ते म्हणाले, आपली संस्कृती प्रत्येकाला सहनशीलता शिकवते. सभ्यता हाच आपल्या देशाचा पाया आहे. कोणतीही विचारी, धर्मनिरपेक्ष व्यक्ती असहिष्णुतेचा विरोधच करेल. देशातील सध्याच्या वातावरणामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती नाराज आहेत. मात्र, त्यांचे ऐकून घ्यायला सरकारकडे वेळ नाही. ‘टाइम स्क्वेअर’वर कोण काय म्हणाले ते ऐकता पण आपल्या देशात कोण काय म्हणतंय ते ऐकावेसे वाटत नाही, असा आरोप त्यांनी केला.
लोकशाही व्यवस्थेमध्ये कोण काय खातंय, याकडे सरकारने लक्ष न देता, देशातील प्रत्येक व्यक्तीला खायला मिळतंय का, प्रत्येकाचे पोट भरतंय का, याकडे सरकराने लक्ष दिले पाहिजे, असाही टोला त्यांनी लगावला.