मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जनाधार फार मोठय़ा प्रमाणावर घटला असल्याचे गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकांमध्ये दिसून आले आहे. याची कारणे शोधण्यासाठी आत्मचिंतन करणे आणि सुधारणेसाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे, असा ‘घरचा अहेर’ पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य एम. ए. बेबी यांनी आज दिला.

माकप केरळमध्ये आणखी चांगली कामगिरी करू शकला असता, तर पश्चिम बंगालमध्ये पक्ष आजवरच्या सगळ्यात मोठय़ा आव्हानाला तोंड देत आहे, असे एट्टूमन्नूर येथे पक्षाच्या बैठकीत भाषण करताना बेबी म्हणाले.
पक्षाचा जनाधार झपाटय़ाने कमी झाला आहे. या पराभवाची कारणे शोधण्यासाठी पक्षाने गुणदोषांचे विश्लेषण करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. केरळमधील डाव्या लोकशाही आघाडी सरकारने २००४ सालच्या लोकसभा निवडणुकांमध्ये जिंकलेल्या चारपेक्षा या वेळी दुप्पट, म्हणजे आठ जागा जिंकल्याची बढाई मारण्यात काही अर्थ नाही असे स्पष्ट केले.

तामिळनाडू : श्रीरंगम विधानसभा पोटनिवडणुकीत तिरंगी लढत ?
पीटीआय, चेन्नई
अभाअद्रमुक तिरुचिरापल्ली जिल्हा सहसचिव एस. वलरमथी यांच्या नावाची श्रीरंगम विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार म्हणून शुक्रवारी घोषणा करण्यात आली. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना भ्रष्टाचारप्रकरणी दोषी ठरविण्यात आल्यानंतर त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक होणार आहे.
ही पोटनिवडणूक प्रमुख पक्षांनी प्रतिष्ठेची केल्याने रंगतदार होणार असल्याची अटकळ बांधण्यात येत आहे. जयललिता यांनी वलरमथी यांच्या उमेदवारीची घोषणा केली. द्रमुकने एन. आनंद यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर केली आहे, तर भाजपनेही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने या मतदारसंघात तिरंगी लढत होणे अपेक्षित आहे.या निवडणुकीच्या निकालामुळे अभाअद्रमुकच्या चार वर्षांच्या कारकिर्दीचा कौल मानला जात आहे.

ब्रह्मा यांनी सूत्रे स्वीकारली
नवी दिल्ली:देशाचे १९वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून शुक्रवारी हरिशंकर ब्रह्मा यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. दिल्ली विधानसभेच्या निवडणुका मुक्त आणि मोकळ्या वातावरणात पार पाडणे याला आपले प्राधान्य असेल आणि मोहिमेचे तेच उद्दिष्ट असेल, असे ब्रह्मा म्हणाले.त्यांना जेमतेम तीन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.